डेंग्यू साथी असल्याच्या गैरसमजामुळे रूग्ण धास्तावले

0

काही दिवसांवर कार्तिकी यात्रा आलेली असताना गावात व्हायरल फ्लू पसरला

देहुगावामध्ये सर्वत्र तापाची साथ; दवाखाने, रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी

देहुरोड : अवघ्या काही दिवसांवर कार्तिकी यात्रा आलेली असताना देहुगावामध्ये व्हायरल फ्लू पसरला आहे. गावातील नागरिक जास्त संख्येने थंडी, तापाने आजारी आहे. संपूर्ण देहुनगरीमध्ये तापामुळे नागरिक तापाने आजारी पडले आहेत. परिसरातील दवाखाने, रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने फुल्ल झाले आहेत. डेंग्यूची साथ असल्याच्या गैरसमजाने रुग्णांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. कार्तिकी यात्रा 5 डिसेंबर रोजी होत आहे. यात्रेत राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक देहूत दाखल होत असतात. देहू परिसरात सध्या डासांचा प्रार्दुभाव वाढल्याचे चित्र आहे. परिसरातील दवाखाने, रूग्णालयांत तापसदृष्य साथीने येथील नागरिकांची संख्या वाढत आहे. डेंग्यूची साथ असल्याच्या गैरसमजाने नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉ. यांच्या म्हणण्यानुसार गावात डेंग्यूची साथ नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र काळजी म्हणून ग्रामपंचायतीने दररोज धुराची फवारणी केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बदलामुळे तापाची साथ

देहुगावातील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये वातावरण बदलले आहे. त्यामुळे सध्या थंडी, तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे काही कुटुंबामधील बहुतेक सदस्य तापाच्या कचाट्यात आले असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी सांगितली. याबाबत अधिक माहिती घेतली असता गेल्या काही दिवसांपासून देहू परिसरातील तापाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या तीन दिवसात साधारण देहू प्राथमिक आरोग्य केंद्रातून 51 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी एकही रुग्णाची सकारात्मक चाचणी आलेली नाही. केवळ एका रुग्णाच्या रक्तपेशींची संख्या कमी झालेली आढळली आहे. मात्र त्यामध्ये डेंग्यूची अथवा मलेरियाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. गावातील काही खासगी रुग्णालयात चौकशी केली असता, तेथील डॉक्टरांनी देखील तापाचे रुग्ण वाढलेले आहेत. मात्र ते डेंग्यू अथवा मलेरियाचे नाहीत. मात्र लोकांच्या मनात डेंग्यू बाबत भीती बसलेली असल्याने तापाचा रुग्ण आढळल्यास लोक डेंग्यूचा रुग्ण असल्याची चर्चा जोरात आहे. यामुळे रुग्णांच्या मनातील भीती घालविण्यासाठी रुग्णांना रक्त तपासणी करण्यास सांगावे लागत असल्याचे समजते.

गावात कचर्‍याचे ढिग

ग्रामपंचायतीचे कर्मचारी दिवाळीच्या सुट्टीला गेल्यानंतर गावात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग लागले होते व त्याची दुर्गंधी येत होती. याबाबत प्रकाश काळोखे यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारही केली होती. गावातील हवेतील बदलामुळे आलेल्या ताप सदृष्य साथीला हद्दपार करण्यासाठी तातडीने धुराची फवारणी करावी व डासांचे निर्मूलन करावे, अशी मागणी येथील श्री संत तुकाराम मंडळाचे अध्यक्ष मोहन काळोखे यांनी केली आहे.