पुणे । चूल आणि मूल ही परंपरागत चौकट ओलांडून महिलांनी सर्वत्र आपले कार्यकर्तृत्त्व सिद्ध केले आहे. महिलांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे सारथ्य 13 महिला कर्मचारी करणार आहेत. मध्य रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा स्तुत्य उपक्रम राबविला जात असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.
ही गाडी 8 मार्च रोजी नियोजित वेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार असून 8 वाजून 25 मिनिटांनी पुणे स्थानकात दाखल होणार आहे. सुरेखा यादव, कृष्णा जोशी गाडीच्या चालक असणार असून, श्वेता घोणे गार्ड म्हणून काम पाहणार आहेत.
सर्व टीम महिलांची
स्मृती सिंग, ज्योती सिंग, पिंकी जाट, सरिता सिंग या रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला जवान, उपनिरीक्षक कविता साहू, मुख्य टीसी गीता कुरूप, मेधा पवार, टीसी म्हणून एस. पी. राजहंस, शांती बाला आणि इलेक्ट्रिक टेक्निशिअन म्हणून योगिता राणे या महिला कर्मचारी डेक्कन क्वीनच्या सेवेत असणार आहेत.