डेक्कन बस स्थानकावर होणार मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब

0

पुणे । वनाज ते रामवाडी मार्गावर डेक्कन जिमखना परिसरात नदीपात्रालगत मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. या स्टेशनलाच पीएमपी बस स्थानक तसेच एकत्रित पार्किंग उभारण्यासाठी डेक्कन जिमखाना बस स्थानकाच्या जागेवर मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारले जाणार आहे. त्यासाठी या बस स्थानकाच्या सुमारे 2 हजार 800 चौरस मीटर जागेची मागणी महामेट्रोने महापालिकेकडे केली आहे. हा प्रकल्प केंद्र शासन तसेच राज्यशासनाचा महत्वाकांक्षी असल्याने तो वेळेत पूर्ण होण्यासाठी ही जागा ताततडीने हस्तांतरीत करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातील वनाज ते धान्य गोडाऊन हे काम सुरू झाले आहे. या मार्गात महामेट्रोकडून शिवाजीनगर येथील धान्यगोदामाच्या ठिकाणी मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब तसेच मेट्रो एक्सचेंज स्टेशन उभारली जाणार आहेत. दरम्यान, या मार्गावर डेक्कन जिमखाना येथे नदीपात्रालगतही मेट्रोचे एक स्टेशन असणार आहे. या स्थानकाला आता डेक्कन बसस्थानक जोडले जाणार आहे. त्यामुळे या भागीतल खासगी जागा आणि महापालिकेची जागा घेऊन या ठिकाणी मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन, पीएमपी स्थानक, रिक्षा स्थानक तसेच पार्किंग आणि इतर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

फर्गसन रस्ता ते शनिवारपेठ स्काय वॉक
या मल्टीट्रान्सपोर्ट हबला जोडणारा फर्ग्युसन रस्ता ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि डेक्कन मेट्रो स्टेशन ते नारायण पेठ (नदीपात्र) असा जोडणारा स्कायवॉकही उभारला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना वाहने मेट्रो स्टेशनपर्यंत न आणता डेक्कन परिसर आणि शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये जाणे सहज शक्य होणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यासाठी ओंकारेश्‍वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या वर्तक उद्यानाजवळील जागेची मागणीही महामेट्रोकडून पालिकेकडे करण्यात आली आहे.