डेरा आश्रमातून 18 मुलींची सुटका

0

सिरसा : दोन साध्वींवरील बलात्कारप्रकरणी सच्चा सौदा डेरा आश्रमाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्याच्या डेर्‍यावर मंगळवारी पोलिसांनी छापा टाकून 18 मुलींची सुटका केली. आश्रमात या मुलींना ‘शाही बेटी’ असे संबोधले जात होते. या मुलींची आता वैद्यकीय चाचणी केली जाणार असून, या मुलींसह सुमारे 250 सेविका गुरुमीत याच्या सेवेसाठी तयार ठेवल्या जात होत्या.

प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, सुमारे 250 महिला व सुटका झालेल्या 18 मुली या गुरुमीत सिंग याच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या होत्या. त्यासाठी त्यांना साध्वी होण्याबाबत खास प्रशिक्षण देण्यात आले होते. या महिलांना अन्य पुरुषांसाठी बोलण्याबाबत प्रतिबंध होते. तसेच, या साध्वी जेथे राहात होत्या त्या इमारतीच्या 10 फूट अंतरात पुरुषांना जाण्यास मनाई होती. केवळ गुरुमीत रामरहीम हाच त्यांच्याकडे जाऊ शकत होता. या सर्व महिलांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अधिकारीवर्गाने दिलेल्या माहितीनुसार, डेर्‍यात अद्यापही 15 हजार समर्थक असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणांतर्फे प्रयत्न सुरु होते.