डेर्‍यातील अत्याचार उघड करणार्‍यांना सलाम!

0

डेर्‍यातील बलात्कार पीडित साध्वी मुली, त्यांचे नातलग, त्यांना फी न घेता सहाय्य करणारे वकील, सी बी आय चा कर्तव्यदक्ष अधिकारी, रामशास्त्र्यांचे वारस म्हणावे असे न्यायाधीश जगदीप सिंग व उच्च न्यायालय या सर्वांना सलाम. या व इतर मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी ’पूरा सच’ चे संपादक रामचंद्र छत्रपती यांनी बलिदान दिले. त्यांचा खून केला गेला. सीमेवर लढणार्‍या जवानांइतकीच किंबहुना त्याहूनही जास्त कठीण लढाई या पत्रकाराने दिली. कारण डे-याच्या गडामधे तो लढत होता. त्यांना प्रणाम!!

भारतीय समाज व राजकीय पक्ष आपला विवेक आणि तर्कबुध्दी गमावत असताना यांनी असीम धैर्य दाखवले. आदर्श निर्माण केला. माणसातील ’वखवख’ व ’लालसा’ हे घडवत आहे. या प्रवृत्ती शतकानुशतके माणसात होत्या. परंतु तंत्रज्ञान व अर्थव्यवस्थेमुळे त्यांना राक्षसी परिमाण मिळाले आहे. बाबा ’राम रहीम’ च्या समर्थकांच्या शेकडो आलिशान मोटारींचा न्यायालयाकडे गेलेला ताफा हेच दाखवतो.

अनासक्ती व सत्याचा लवलेश नसताना धार्मिकता व अध्यात्माची झूल पांघरली जाते. या बाबाचे करोडो भोळसट अनुयायी आहेत. ते, बाबा अडी – अडचणीत सापडलेल्यांना कसे कनवाळूपणे मदत करतात याचे भावुक होऊन वर्णन करतात. पण हेच बाबा व त्याचे राजकीय – आर्थिक सत्ताधारी सहकारी आपल्याला आधी अडचणीत आणतात हे समजुन घेत नाहीत. उदा. सुमारे 25 – 30 वर्षांपूर्वीपर्यंत देशात सर्वत्र सरकारी व पालिकांच्या रुग्णालयांत सर्व आजारांवर उत्कृष्ट उपाय विनाशुल्क केले जात होते. शिवाय कर्करोग ( कॅन्सर ) एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे का वाढला ? त्याच्या कारणात शिरलो तर काय दिसते. रासायनिक खते, कीटकनाशके इ.चा शेतीतील वापर, अन्नाची भेसळ, मोटार व इतर वाहनांतून होणारे उत्सर्जित वायू , द्रव्ये व अणुभट्ट्यांसह अणुऊर्जा कार्यक्रमातून पृथ्वीवर सतत पसरणारा किरणोत्सार ही प्रमुख व इतर अनेक कारणे. सगळे कुणितरी स्वार्थासाठी जगात राबवलेल्या भौतिक आधुनिकतेचे परिणाम आहेत.

ज्याप्रमाणे या प्रकरणात बलात्कार व खून होतात त्याप्रमाणे मानवी लालसेमुळे रोज पृथ्वीवर, निसर्गावर बलात्कार व जैविक विविधतेचा खून होत आहे. त्यामधील दुवा ’तंत्रज्ञान’ व ’पैसा’ आहे.’जीवनमुल्यांवर आधारित साधी जीवनशैली’ हे दोन्हीकडे समस्येचे उत्तर आहे. बाबा, महाराज हे आपल्यातील सूक्ष्म दुष्प्रवृत्तींचे मोठे प्रतिबिंब आहेत.
म्हणूनच अशी एकामागे एक प्रकरणे उघड होत असूनही समाजाची घसरण चालूच आहे. आत्मचिंतन व परिक्षण होत नाही. कठोर कायदे व त्यांची अंमलबजावणी हवी, पण समाज का सडत चालला आहे ? यासाठी प्रश्नाचे मूळ कारणही समजायला हवे. ज्या अर्थशास्त्रामुळे व त्याचे भागीदार असलेल्या औद्योगिकरण – शहरीकरणामुळे यास अंगावर येणारे सर्वंकष भयावह रूप मिळते, त्यास संमोहन करणार्या मंत्राचे रूप घेतलेल्या ’विकास’ या फसव्या शब्दाच्या आवरणामुळे प्रश्नच विचारला जात नाही. मग खरी नैसर्गिक पिके येणे एकीकडे कठीण होत चालले असताना बाबा, महाराजांचे व त्यांच्या राजकीय आश्रयदात्यांचे पिक मात्र जोमात येते.

 

– अ‍ॅड. गिरीश राऊत
भारतीय पर्यावरण चळवळ/ वसुंधरा आंदोलन
9869023127