जळगाव । शहरातील पार्वतीनगर भागात जिल्हा कुष्ठरोग विभागाचे प्रमुख तथा आरोग्यसेवा विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.अरविंद सुपडू मोरे यांची गळा चिरून हत्त्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चालक घरी घेण्यासाठी आल्यानंतर उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून डॉ.मोरे यांचा खुन साधारण 15 ते 17 तासांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर घटनेची माहिती मिळताच काही मिनिटातच पोलिस अधीक्षकांसह बड्या अधिकार्यांनी व चार ते पाच पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी मोरे यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना पाहणी करत असतांना एक करवत मिळून आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
3 महिन्यापूर्वी झाली बदली
शहरातील रामानंदनगर स्टॉपच्या मागील बाजूस असलेल्या पार्वतीनगर रोड वरील प्लॉट क्र.3 वर असलेले जे.एन. पाटील यांच्या श्रीराम नामक घरात वरच्या मजल्यावर गेल्या वीस ते पंचविस दिवसांपासून डॉ.अरविंद सुपडू मोरे (वय 52, मुळ रा.नाशिक) हे भाड्याने राहत होते. मागील तीन महिन्यांपूर्वीच त्यांची जळगाव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक म्हणून बदली झाली होती. त्याआधी ते धुळे जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणुन कार्यरत होते. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात त्यांचे स्वतंत्र कार्यालय होते. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांचा वाहनचालक जालीम जाधव हे त्यांना घेण्यासाठी घरी पोहोचले. परंतु त्यांना डॉ.मोरेंकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर चालकने घर गाठल्यावर घटना उघडकीस आली.
ठसेतज्ज्ञ, श्वानपथकासह गुन्हे शाखेची पाहणी
घरात गेल्यानंतर जाधव यांना वरच्या गच्चीवजा खोलीत रक्ताच्या थारोळ्यात डॉ.मोरे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ रामानंद पोलीस स्थानकात घटना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, विभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. राजेसिंह चंदेल, रामानंद नगर पोलिस तसेच पोनि. प्रविण वाडीले यांनी धाव घेतली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्वानपथक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मृतदेहाची व घटनास्थळाची तपासणी केली. श्वान हॅप्पी घटनास्थळी पोहोचले परंतु ते माग काढू शकले नाही. खून झालेल्या खोलीतच हॅप्पी घुसमटले. यानंतर फॉरेन्सीक पथकाकडून संपूर्ण खोलीची तपासणी करण्यात आली. यावेळी रक्तांच्या थारोळ्यावर पायांच्या ठश्याशिवयाय काही सापडले नाही.
पायाखाली आढळली करवत
पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर पाहणी करतांना डॉ.मोरे यांचा मृतदेह दरवाजाच्या व्हरांड्यात होता तर त्यांच्या पायाखाली धारदार करवत आढळून आली. गळा चिरल्याच्या लांबलचक खूणा व गळ्याजवळ चार इंचापेक्षा जास्त खोल भोसकले होते. प्राथमिकदृट्या हा खूनच असल्याचे आढळून येत आहे, मात्र तरीही त्यांनी आत्महत्या केली असावी का? या शक्यतेनेही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या पथकाला पुरावे मिळाले नसल्यामुळे नाशिक येथील फॉरेन्सिक टिमला बोलविण्यात आल्यानंतर दुपारी नाशिक येथील टिमने घटनास्थळी येवून पुन्हा पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न केले.
महिन्याभरापूर्वीच झाले रूजू
5 ते 20 सप्टेंबर दरम्यान जळगाव जिल्ह्यात आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येणार होती. त्यासाठी पुणे येथील एक पथक आज जळगावात येणार होते. त्यासाठी डॉ.मोरे हे आज नियमित वेळेपेक्षा लवकरच कार्यालयात पोहोचणार होते, असे कळते. साधारण एक महिन्यापुर्वीच त्यांनी घर भाड्याने घेतले होते. डॉ.मोरे हे एक महिन्यापूर्वीच जळगावला पदोन्नतीवर रुजू झाले होते. तत्पूर्वी हे धुळे येथे कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर डॉ. मोरे यांच्या पत्नी नाशिकहून तर दोघं मुले मुंबई येथून दुपारी जळगाव गाठले. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयात मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला.
परिसरात नागरिकांची गर्दी
डॉक्टराची हत्या झाल्याच्या वार्तेने नागरिकांनी एकच गदी केली. यातच जिल्हापेठ, रामानंदनगर, शनिपेठ तसेच शहर पोलिस, डिबी कर्मचार्यांनी देखील घटनास्थळी हजेरी लावली होती. दुपारी विभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी मृतदेह तसेच रक्ताच्या थारोळ्यात भरलेली खोलीची पाहणी करत पुराव्याचा शोध घेतला. परंतू, करवतीशिवाय काहीही मिळाले नाही. श्वानपथकास अपयश आले. अखेर डॉ. मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.