रावेर । डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाला रावेर शहरातही प्रतिसाद मिळत आहे. परंतु सर्वसामान्य रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होतांना दिसत आहे. मागील चार दिवसांपासून संप सुरु आहे. शहरात विविध आजारांवर उपचारासाठी अनेक खाजगी दवाखाने आहे. परंतु मार्ट आणि आयएमएने पुकारलेल्या संपामुळे शहरातील दवाखाने कडकडीत बंद आहे. काही खाजगी दवाखान्यांमध्ये अतिआवश्यक रुग्णांचीच तपासणी केली जात आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे अनेक शस्त्रक्रिया, दररोजची ओपीडी बंद असल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे.
ग्रामीण रुग्णालयात मात्र रुग्णसेवा
शहरातील सर्व डॉक्टर सुरक्षेसह इतर मागण्यांसाठी कडकडीत संपावर आहे तर इकडे ग्रामीण रुग्णालयात वेळेपेक्षा जास्त काळ मागील चार दिवसांपासून आलेल्या सर्व रुग्णांची ओपीडी करुन औषधोपचार करत आहे. खाजगीकडून आलेले रुग्णदेखील ग्रामीणच्या औषधी घेत आहे. येथील डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेलांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अभिषेक मानधना, डॉ. विशाल सुरेला तपासणी करत आहे.
यांचा आहे समावेश
शहरातील डॉ. संदिप पाटील, डॉ. योगिता पाटील, डॉ. डिगंबर पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. गुलाबराव पाटील, डॉ. भगवान कुवटे, डॉ. प्रविण चौधरी, डॉ. चैताली चौधरी, डॉ. योगेश पाटील, डॉ. मिलींद वानखेडे, डॉ. संध्या वानखेडे, डॉ. दत्तप्रसाद दलाल, डॉ. ताराचंद सावळे, डॉ. प्रिती सावळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. किशोर महाजन, डॉ. अस्मिता महाजन आदींचा संघटनेने पुकारलेल्या संपात सहभाग आहे.
काही रुग्णालय सुरु
संपात सहभागी असलेल्या दवाखान्यांमध्ये फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी अतिआवश्यक असलेल्या रुग्णांचीच तपासणी केली जात होती. मात्र यात काही डॉक्टरांनी संप पुकारुन रुग्णांना वेठीस न धरता रुग्णसेवेला प्राधान्य देऊन ओपीडी करतांना दिसून आले त्यामुळे राज्य ठिकाणी संप असला तर कुठे लपूनछपून, कुठे सर्रास ओपीडी रावेरचे डॉक्टर करत आहे.
डॉक्टरांच्या विविध प्रश्नासंदर्भात आयएमए संघटनेने संप पुकारला. कोणतेही ठोस आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार आहे.
– डॉ. अतुल सरोदे, अध्यक्ष, रावेर, सावदा, यावल, आयएमए