‘डॉ. तात्याराव लहानेंचा समाजासमोर आदर्श’

0

शिरूर । सर्व सामान्यांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचा उपक्रम राबवुन प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला असून त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान महान असल्याचे मत शिरूर, हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे व्यक्त केले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राळेगण सिध्दी येथे महा आरोग्य शिबीर घेण्यात आले होते. यावेळी मोतीबिंदू निदान झालेल्या 370 रूग्णांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शेळके व नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर येथे ग्रामीण रूग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन 11 व 12 रोजी करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी समारोपाच्या कार्यक्रमावेळी आमदार पाचर्णे बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, रामलिंगचे माजी सरपंच अरूण घावटे, राळेगण सिध्दीचे उपसरपंच लाभेश औटी, खरेदी विक्री संघाचे आबासाहेब सोनवणे, डॉ. रागिणी पारेख, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. शंकर रोकडे, वैद्यकीय अधिकारी धनंजय पोटे, डॉ. तूषार पाटील, डॉ. ननवरे, डॉ. सोनवणे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाणे यांनी समाजीक बांधिलकीचे जतन करत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया करून अनेकांना त्यांना दृष्टी देण्याचे महानकार्य करत असून आगामी काळात शिरूर हवेली मतदार संघात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर घेणार असल्याचे आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले.