डॉ. दाभोळकर हत्याकांड : चौकशीत हलगर्जी करणार्‍या पोलिसांचा अहवाल द्या!

0

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष व विवेकवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडाला चार वर्षे उलटले तरी, त्यांचे मारेकरी पकडले जात नाहीत याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलाच संताप व्यक्त केला. या हत्याकांडाच्या तपासात हलगर्जी करणार्‍या पोलिसांचा अहवाल सादर करा, त्यांच्याकडून झालेल्या चौकशीचेही अहवाल सादर करा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने सीबीआय व महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. याप्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अनेक कच्चेदुवे सोडलेले आहेत. त्यामुळेच मारेकरी पकडले जात नाहीत, असा संशयही यावेळी व्यक्त करण्यात आला.

तपासात कच्चेदुवे सोडले?
20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात भरदिवसा अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला चार वर्षे उलटून गेली आहेत. तरीही अद्याप मारेकरी पकडले गेले नाहीत. पोलिसांनी काही संशयितांना पकडले होते. परंतु, पुराव्याअभावी त्यांची सुटका करावी लागली होती. याप्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तपासात पोलिसांनी अक्षम्य हलगर्जी केल्याचा संताप न्यायालयाने व्यक्त केला. तसेच, पोलिसांनी केलेल्या चौकशीचे अहवाल न्यायालयात सादर करा. या दुर्देवी हत्याकांडाच्या तपासात पोलिसांनी कच्चेदुवे सोडलेले आहेत. त्यामुळेच आरोपी पकडले जात नाहीत. तसेच, जे पोलिस अधिकारी निष्काळजी व हलगर्जी करताना आढळतील त्यांना शिक्षा द्यावी, असेही उच्च न्यायालयाने सुनावले. न्यायालयाच्या या फटकारनंतर तरी पोलिस मारेकरी पकडतील का? याकडे आता राज्याचे लक्ष लागलेले आहे.