नागपूर । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शहरातील दीक्षाभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झालेे. शुक्रवारपासूनच निळ्या रंगाच्या विद्युत रोषणाईने दीक्षाभूमी उजळून निघाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता दीक्षाभूमिवर आले होते. दीक्षाभूमिवर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
बाबासाहेबांचा अनमोल ठेवा आल्याची प्रतिक्रीया
दीक्षाभूमिवर प्रेरणा मिळते, म्हणून 14 एप्रिलला आम्ही इथे येतो आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो, अशा प्रतिक्रिया दीक्षाभूमीवर येणारे तरुण देत आहेत. तर ‘अनेक काळापासून जो समाज वंचित होता, त्या समाजाला बाबासाहेबांनी शिक्षण देऊन पुढे आणले, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा, बाबासाहेबांनी हा अनमोल ठेवा दिला म्हणून आम्ही दीक्षाभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया दीक्षाभूमिवर आलेल्या नागरिकांनी यावेळी दिली आहे. संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील आंबेडकरी जनताही याठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आली होती.
निळ्या पाखरांनी परिसर गजबजला
14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी दीक्षाभूमिवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळेच आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बौद्ध धर्माचे अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपली उपस्थिती दिली. देशभर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. देशभरातील बौद्ध बांधवांच्या प्रेरणेचे ठिकाण असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीवरंही जयंतीचा मोठा उत्सव पहायला मिळाला. बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंधेलाच दीक्षाभूमीला रोषणाई करण्यात आली. आणि आज सकाळपासून निळ्या पाखरांनी संपूर्ण दीक्षाभूमीचा परिसर व्यापून गेला होता.