यवत । दौंड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगर मोरी रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. या नियमबाह्य कामकाजाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता, सल्लागार अभियंता व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे व कामापेक्षा जादा अदा केलेली रक्कम व्याजासहीत वसूल करण्याचे आदेश दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय थोरात यांना दिले आहेत. या आदेशामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगर मोरी या रस्त्याचे काम नियमबाह्य झाले असून या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी दौंड नगरपालिकेचे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य अनिल लक्ष्मण साळवे यांनी केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी व सहायक संचालक नगरपालिका प्रशासन मुंबई यांच्याकडे त्यांनी तक्रारही केली होती. या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावाही केला होता. साळवे यांच्या अर्जानुसार तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांच्या नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्यासाठी दौंड-पुरंदर उपविभागाचे प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
कारवाईचा बडगा
जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाबाबत सध्याचे दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय थोरात यांना विचारले असता त्यांनी प्राप्त आदेशानुसार तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे, प्रभारी अभियंता अभिमन्यू येळवंडे, सल्लागार अभियंता विकास ओझर्डे व ठेकेदार कोकरे ब्रदर्स यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कामात डांबर, खडीचा अभाव
या समितीने 29 मे 2017 रोजी चौकशी अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांचा अहवाल आणि समितीने प्रत्यक्ष केलेल्या स्थळ पाहणीच्या अहवालावरून रस्त्यांना पडलेले खड्डे तसेच ठराविक निकषानुसार आवश्यक असणारा डांबरीकरणाचा थर व खडीचा थर प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा कमी आढळून आला. ठेकेदाराकडून विलंबापोटीचा दंड वसूल केला नाही, असा अहवाल दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मुख्याधिकार्यांनी त्यांच्या अखत्यारीत योग्य त्या नियमानुसार कारवाई करावी व देयक रकमांची परिगणना करून कामापेक्षा जास्त अदा केलेल्या रकमांची व्याजासहीत वसुली जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे करावी, असे आदेश दिले आहेत.