नवी मुंबई :- तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ऐरोली येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनावरील डोमला लागणाऱ्या मकराना मार्बलचा प्रस्ताव रद्द केल्याने शहरात एकच गदारोळ माजला होता तर दलित समाजात संतापाची लाट पसरली होती.त्याचवेळी सदर वास्तूचे उद्घाटन १४ एप्रिलला होणार असल्याचे सांगण्यात येत होते.मात्र या भवनात अनेक कामे प्रलंबित असल्यामुळे उद्घाटनाला विलंब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आता या वास्तूचे उद्घाटन डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबर करण्यात येणार असल्याचे समजते.
मुलुंड ऐरोली खाडी पुलाच्या उत्तर बाजूस ऐरोली सेक्टर १६ येथे पाच हजार ७५० चौरस मीटर क्षेत्रफळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मृती भवन उभारण्यात येत असून त्यासाठी जवळपास ५२ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. गेली चार वर्षे या भवनाचे काम सुरू असून माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १४ एप्रिल रोजी या स्मृतिभवनाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. तसे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.मात्र भावनाचे काम अर्धवट असल्याने त्याचे लोकार्पण होणे शक्य नाही.मुंढे यांच्या बदलीमुळे संगमरवर की रंग हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे येण्याची चिन्हे आहेत. हा मुद्दा सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. सर्वसाधारण सभा हा प्रस्ताव नवीन आयुक्तांच्या संमतीसाठी पाठवेल. त्यानंतरच्या कामांसाठी पुढील आठ महिने लागणार आहेत, त्यामुळे लोकार्पणासाठी ६ डिसेंबरही तारीख निश्चित करण्यात आल्याचे समजते.