पोलिसांना पिण्यासाठी पाण्याच्या बॉटलचे मोफत वाटप
शहादा। राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा नोंदीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वत्र लॉकडाऊन असले तरी पोलीस प्रशासन मात्र दिवस-रात्र झटत आहे. कडाक्याच्या उन्हातही आपले कार्य चोख बजावत आहे. अशावेळी मात्र शहरातील डॉ. भरत पाटील यांनी माणुसकी दाखवत शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रोज साडेबारा व साडे तीन वाजेला शुद्ध पिण्यासाठी पाण्याच्या बॉटलचे मोफत न चुकता दररोज वाटप करतात. शिवाय गरज वाटल्यास नाश्ता व इतर सोयी स्वतःहून उपलब्ध करून देत असल्याने त्यांच्या या माणुसकीने पोलिसही गहिवरले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात सुदैवाने अद्यापपर्यंत एकही कोरोना संशयित रुग्ण आढळला नसला तरी सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे शहर व परिसरात सर्वच ठिकाणी पोलिस तैनात आहेत. सर्व व्यवसाय प्रतिष्ठाने बंद असल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाण्याची सोय व्हावी, म्हणून शहरातील डॉ. भरत पाटील दररोज दोन वेळा बंदोबस्त कामी असलेल्या पोलिसांना पाणी बॉटल स्वतः ज्या ठिकाणी बंदोबस्ताला आहेत तिथे जाऊन मोफत पुरवतात. शिवाय त्यांनी बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक ही दिला आहे गरज भासल्यास पोलीसही स्वतःहून त्यांना फोन करून नास्ता वगैरे आवश्यक साहित्य मागून घेतात. विशेष म्हणजे अव्याहतपणे ते आजतागायत दररोज नित्यनेमाने पाण्याची सोय करत आहेत. त्यांच्या या सेवेबद्दल प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी कौतुक केले.