पिंपरी-चिंचवड : शालेय अभ्यासक्रमातून मोघलांचा इतिहास वगळून सत्याला दडपण्याचा-मारण्याचा प्रकार सध्या सुरू आहे आणि त्याचे समर्थन करणारे विद्वान हे बैल आहेत. सरकारने अशा बैलांना दावणीला बांधू नये, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे नाव न घेता केली. तसेच, सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण? भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक यांच्या वादावरही त्यांनी भाष्य करत, हा वाद वांझोटा असल्याचे सांगितले. डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येचा तपास का लागत नाही, पोलिस झोपा काढत आहे का? असा संतप्त सवालही सबनीस यांनी करून एकच खळबळ उडवून दिली.
मोगलांचा इतिहास वगळणे ही घोडचूक!
पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावे दिल्या जाणार्या एका पुरस्कार वितरण समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, राज्य सरकारने मोघलांचा इतिहास वगळून घोडचूक केली आहे. ती चूक सरकारने सुधारली पाहिजे. पण काही साहित्यिक मात्र या चुकीचे समर्थन करत आहेत. हे साहित्यिक सरकारच्या दावणीला बांधलेले बैल आहेत. केवळ सरकारी लाभ मिळवून घेण्यासाठीच ते सरकारच्या दावणीला बांधून घेत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. शालेय अभ्यासक्रमातून मोघलांचा धडा वगळण्याच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या निर्णयाचे डॉ. मोरे यांनी समर्थन केले होते. त्यापार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि साहित्यिकांच्या भूमिकांवर कडाडून प्रहार केला.
भाऊसाहेब रंगारी किती राष्ट्रभक्त?
गणेशोत्सवाचे आद्य संस्थापक लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी या सध्या सुरू असलेल्या वादावरही त्यांनी परखड भाष्य केले. हा वादच मुळात वांझोटा आहे, असे सांगत रंगारींनी घरातला गणपती सार्वजनिक गणपती म्हणून रस्त्यावर आणला असेल तर त्या उत्सवाचा पहिले श्रेय त्यांना द्यायलाच हवे. पण टिळकांच्या तुलनेत रंगारी किती राष्ट्रभक्त आहेत? असा सवालही त्यांनी केला. महापुरूषांमध्ये जसे सामर्थ्य असते तसेच मर्यादाही असतात, याचे भान समाजात जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत असले वांझोटे वाद सुरूच राहतील, असेही सबनीस म्हणाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांचे मारेकरी अजूनही पकडले का जात नाहीत? ते मोकाट का आहेत? असा सवाल करतानाच सरकार आणि तपास यंत्रणा गोट्या खेळत आहेत की झोपा काढत आहेत? असा संतापही त्यांनी व्यक्त केला. पोलिस यंत्रणेचे काम निषेधाच्याही पलिकडचे आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.