जाधवर क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभ ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट
पुणे : नर्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे दुसर्या जाधवर स्पोर्टस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलचे विजेतेपद सलग दुसर्या वर्षी डॉ. सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाला मिळाले. यावेळी विजेत्या संघाला संस्थेचा फिरता करंडक देण्यात आला. स्पोर्टस फेस्टिवलमधील सर्वाधिक खेळांत डॉ. सुधाकरराव विद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. स्पर्धेत मराठी, इंग्रजी माध्यमातील एकूण 6 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
नर्हे येथील जाधवर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी संस्थचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, प्रा. डॉ. दिपक भामरे व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. विजेत्या खेळाडुंना मेडल, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत ज्युनियर केजी ते इयत्ता 10 वी या वयोगटातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पोर्टस फेस्टिवलचे यंदा दुसरे वर्ष होते. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, डॉजबॉल, रिले यांसारख्या सांघिक आणि तिरंदाजी, बुध्दीबळ, धावणे, कराटे, यांसारख्या वैयक्तिक क्रीडाप्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या.
आपल्याकडे फक्त गुणांची स्पर्धा
प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, परदेशात विद्यार्थी घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. परंतु ही परिस्थिती भारतात दिसत नाही. आपल्याकडे विद्यार्थ्यांमध्ये गुणांची स्पर्धा दिसते. आपल्या पाल्याने गुण किती मिळविले यापेक्षा त्यांच्यामध्ये किती विविध कौशल्य आहेत, हे देखील पालकांनी पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सक्षम होण्यासाठी मानसिक व शारिरीकरीत्या सक्षम असणे गरजेचे आहे, असे ही त्यांनी सांगितले.