डॉ.सुमित चौधरींवर गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळात निदर्शने

0

डॉक्टरावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा ईशारा ः राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ- शहरातील अरूणा हॉस्पीटलचे डॉ.सुमित चौधरी यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे विवाहितेचा मृत्यू ओढवला असून डॉक्टरांवर वैद्यकीय कायद्यानुसार कारवाई करून डॉक्टरांना अटक करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा ईशारा राष्ट्रीय मजदूर सेनेने सोमवारी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला. तत्पूर्वी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून डॉ.चौधरी यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला.

डॉक्टरांवरील कारवाईकडे लागले लक्ष
शहरातील शिलाबाई शंकर वानखेडे यांच्या गर्भपिशवीवरील शस्त्रक्रियेसाठी बालाजी मंदीरालगतच्या अरुणा हॉस्पीटलचे डॉ.सुमित चौधरी यांनी उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले होते मात्र दोन दिवसानंतरही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही त्यामुळे रुग्ण महिलेची प्रकृती खालावून त्यांचा मृत्यू झाला. डॉ.सुमित चौधरी हेच महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असून त्यांच्यावर वैद्यकीय कायद्यानुसार कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करावी अन्यथा राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे 24 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हाप्रमुख राजू डोंगरदिवे यांनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे शहरातील वैद्यकीय क्षैत्रात खळबळ उडाली असून डॉ.सुमित चौधरी यांच्यावर काय कारवाई होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतप्त नातेवाईकांचाही डॉक्टरांवर रोष
उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे शिलाबाई वानखेडे यांचा शुक्रवारी रात्री 9.30 वाजता मृत्यू झाला. याची माहिती मिळताच मयत महिलेच्या नातेवाईकांनी डॉ.सुमित चौधरी यांच्यावर रोष व्यक्त करीत रूग्णालयाची किरकोळ तोडफोड केली तर या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने नातेवाईक शांत झाले होते.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
राष्ट्रीय मजदूर सेनेने मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्य आरोग्य मंत्री यांच्यासह पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईच्या मागणीचे निवेदन पाठवले आहे. या निवेदनावर राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हाप्रमुख राजू डोंगरदिवे, दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, भगवान निरभवणे, अन्वर भाई, नाजीर भाई, आकाश विरघर, सुभाष सपकाळे, राजू चौथमल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.