संसारोपयोगी साहित्याचे नुकसान : सुदैवाने जिवीतहानी टळली
यावल- तालुक्यातील डोंगरकोठरा येथील खालचे गाव भागात दोन घरांना अचानक सोमवारी दुपारी आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. खुशाल हरचंद सोनवणे व पिंटू छगन कुंभार यांच्या घरांना अचानक लागलेल्या आगीत घरात संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. खुशाल सोनवणे व पिंटू कुंभार हे गरीब कुटुंब नेहमीप्रमाणे मजुरीसाठी शेतात गेली असताना वाड्यातील लोकांना सोमवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घरातून अचानक धूर बाहेर निघताना दिसला. तत्काळ गावातील स्वामिनारायण मंदिरातील भोंगा तीन वेळा वाजविण्यात आला. तेव्हा ग्रामस्थ मदतीसाठी धावून आल्यानंतर आग विझवण्यात यश आले. या दरम्यान तातडीने घरातील गॅस सिलिंडर तरुणांनी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
चुल्याची ठिणगी उडाल्याने आगीचा संशय
आगीचे निश्चित कारण कळू शकले नसलेतरी घरातील चुल्याजवळील अंथरुणावर ठिणगी पडलयाने आग लागल्याचा संशय आहे. या आगीत घरातील संसारोपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. दोन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत.घटनास्थळी उपसरपंच नितीन भिरुड, ग्राम पंचायत सदस्य रत्नदीप सोनवणे, इच्छाराम वाघ, तलाठी कुंदन जाधव तसेच तरुण व ग्रामस्थांनी आग विझवण्याकामी धाव घेतली.