डोंगरगाव(लोय)येथील अंगणवाडी सेविकांची रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती

0

नंदुरबार। तालुक्यातील डोंगरगाव(लोय)येथील अंगणवाडी सेविका ‘ताई’ने कोरोनाला हद्दपार करण्याचा विडा उचललेला आहे. रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली असून, त्या गावातील महिलांना वेळोवेळी हात धुण्याचे आवाहन करीत प्रशिक्षिण देत आहेत.

कोरोना ( कोविड-१९) विषाणू महामारीच्या भीतीने संपूर्ण जग हादरलेले आहे. देशात व राज्यात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे.शासन, प्रशासनाच्या माध्यमातून ‘गो कोरोना’ साठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.सामाजिक संस्थांही जनजागृतीसाठी योगदान देत आहेत. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. ज्या समाजात आपण वावरत आहोत. त्या समाजाचे ऋण फिटावे या हेतूने तालुक्यातील डोंगरपाडा (लोय) येथील अंगणवाडी सेविका बबिता रोशनराज पाडवी गावात कोरोणाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करीत आहेत.शासनाकडून एक रुपया न घेता स्वखर्चातून त्यांनी सॅनिटायजर,साबणाची खरेदी करून अंगणवाडी सेविका पाडवी दररोज गावातील महिलांना हात धुण्याचे प्रशिक्षण देत आहेत.

गावातील अंगणवाडीच्या कार्यालयात अंगणवाडी सेविका बबिता पाडवी यांनी रांगोळीतून भारताचा नकाशा रेखाटला आहे.त्यात कोरोना संसर्गाचा सामना नागरिकांनी कशा पद्धतीने करायचा हे दर्शविले आहे. संसर्ग टाळण्यासाठी साबणाने किंवा सॅनिटायजरने हात स्वच्छ धुतले पाहिजे,सोशल डिस्टन्सचे पालन, तोंडावर मास्क घालण्याचे चित्र रांगोळीतून रेखाटण्यात आले आहे.