डोक्यात दगड घालून सराईत बालगुन्हेगाराची हत्या!

0

वायसीएम रुग्णालयातून एका आरोपीस अटक; सात ते आठ साथीदार फरार

देहूरोड : युवकाला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका सराईत बालगुन्हेगाराला एकटे गाठून त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत, डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री 11 च्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देहूरोड, सेंट्रल चौकात घडली. सुभान शेख उर्फ शब्बीर उर्फ रोहित्या अमीन सोळंकी (वय 17, रा. देहूगाव. सध्या रा. गांधीनगर, देहूरोड) असे हत्या झालेल्या बाल गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेनंतर देहूरोड पोलिसांनी एका आरोपीस पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातून अटक केली. त्याचे अन्य सात ते आठ साथीदार फरार झाले आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हत्या झालेला सुभान हा बालगुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

घडलेली हकीकत अशी
याप्रकरणी खास सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुभान शेख याच्या एका मित्राचा गांधीनगर, देहूरोड येथे काल वाढदिवस होता. मित्राचा वाढदिवस साजरा केल्यानंतर तो पारशीचाळ येथे आला. तेथे त्याने शस्त्राचा धाक दाखवून अंकुश बिडलान नामक युवकाला दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने शिवाजी विद्यालयाजवळ नेऊन बिडलान याला मारहाण केली. नंतर तो सेंट्रल चौकाच्या दिशेने पळाला. मात्र, याच वेळी बिडलान याला सुभान याने पळवून नेल्याची बातमी पारशीचाळीत वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे संतप्त झालेल्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने सुभानचा पाठलाग केला. टोळक्याने बिडलान याला सोबत घेऊन सेंट्रल चौक गाठला. तेथे महामार्गाच्या कडेला सुभान एकटाच बेसावध उभा होता. टोळक्याने तेथे सुरुवातीला सुभानला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.

सुभान होता सराईत बालगुन्हेगार
हत्या झालेला सुभान शेख हा युवक सराईत बालगुन्हेगार होता. त्याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दरोडा, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन असल्यामुळे सतत तो सुटत होता आणि पुन्हा गुन्हे करीत होता, असे देहूरोड पोलिसांनी सांगितले.अल्पवयीन असल्याचा तो फायदा घेत होता. देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रत्येक गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. मात्र, अल्पवयीन असल्यामुळे त्याची लगेच सुटका होत होती. दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये रजिस्टर क्रमांक असे : 248/16 (भादंवि कलम 307- खुनाचा प्रयत्न), 139/16 (भादंवि कलम 324- मारहाण करणे), 331/17 (भादंवि कलम 324- मारहाण), 212/17 (भादंवि कलम 307, 353- खुनाचा प्रयत्न व लोकसेवकावर बलप्रयोग), 238/17 (भादंवि कलम 326- घातक हत्याराने जबर मारहाण), 269/17 (भादंवि कलम 395- दरोडा) आणि 80/17 (भादंवि कलम 307, 395- खुनाचा प्रयत्न व दरोडा). याशिवाय 16 ऑगस्टला त्याला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याच्याकडुन गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला होता.

एकास अटक
याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अंकुश नरेश बिडलान (वय 20, रा. पारशीचाळ, देहूरोड) याला अटक केली आहे. त्याच्या अन्य साथीदारांच्या शोधार्थ पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. अवघ्या दोन वर्षात पोलिसांना जेरीस आणणारा सराईत बालगुन्हेगार सुभान शेख याच्या हत्येची बातमी वार्‍याच्या वेगाने देहूरोड परिसरात पसरली. टोळक्याने मारहाण केल्यानंतर सुभान रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अंकुश याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातून अटक झाली. सुभान याने मारहाण केल्याने त्याच्या मानेवर व खांद्यावर जबर मार लागला आहे. तो उपचारासाठी वायसीएममध्ये गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांची दक्षता
या घटनेची माहिती मिळताच देहूरोड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणतराव माडगुळकर, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण मोरे हे पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. त्यानंतर देहूरोड परिसरात तणाव होऊ नये, म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला. तसेच पेट्रोलिंग सुरू केली होती. पोलिसांनी दक्षता घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.