जळगाव। नवीन बांधकाच्या बिल्डींगच्या दुसर्या मजल्यावरून लोखंडी पाईप घेऊन जाणार्या दोन्ही कामगारांच्या हातातून पाईप निसटून तो खालच्या मजल्यावर बिल्डींगवर पाणी मारत असलेल्या वॉचमनच्या डोक्यात पडला. त्यात वॉचमन गंभीर जखमी झाल्याने त्याला लागलीच कामगारांनी खाजगी रूग्णालया दाखल केले. काही दिवस उपचार घेतल्यानंतर वॉचमनचा जिल्हा रूग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी आज मंगळवारी वॉचमनच्या कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिल्डींगमालकासह पाच जणांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
मजुरांच्या हातातून निसटला पाईप अन् वॉचमनच्या डोक्यात पडला
करणसिंग सिताराम राठोड हे पत्नी मिराबाई मुलगा तसेच नवल व त्याची पत्नी यमुनाबाई यांच्यासह रमेश जगन्नाथ सांगोरे (रा.भोईटेनगर) यांच्या नवीन बिल्डींगच्या बांधकामावर कामाला होते. करणसिंग व त्यांचा मुलगा हे पाण्या मारण्याचे व वॉचमन म्हणून काम पाहत होते. त्यामुळे बिल्डींगच्या बाजुलाच त्यांना राहण्यासाठी खोली देण्यात आली होती. दरम्यान, 29 एप्रिल रोजी नवल हा मध्यप्रदेशातील खिडकीयॉ येथे नातेवाईकांकडे लग्न असल्यामुळे सकाळी 7 वाजता निघून गेला. त्यानंतर करणसिंग व पत्नी मिराबाई घरीच होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास बांधकाम मालकाचा मुलगा राजेश हा त्या ठिकाणी आला बिल्डींगवर पाण्या मारण्यासाठी सांगितले. परंतू काम चालू असून सायंकाळी काम बंद झाले की पाणी मारतो, कारण काम सुरू असून बिल्डींगवरून काहीही खाली पडू शकते असे वॉचमन करणसिंग राजेश सांगितले. परंतू राजेश याने पाणी मारण्यासाठी सांगून काही झाल्यास मी जबाबदार असे बोलला. त्यानंतर करणसिंग हे खालच्या मजल्यावरील बिल्डींगला पाणी मारत होते. त्याचवेळी सेट्रींग कामगार मोतीराम पावरा व दिलीप पावरा हे दोन्ही दुसर्या मजल्यावरून तिसर्या मजल्यावर लोखंडी पाईप घेऊन जात होते. पाईप घेऊन जात असतांना त्यांच्या हातातून पाईप निसटला आणि तो खालच्या मजल्यावर पाणी मारत असलेले वॉचमन करणसिंग यांच्या डोक्यात पडला. डोक्यात पाईप पडताच करणसिंग हे बेशुध्द पडले. त्यांना तातडीने मजुरांनी व त्यांच्या पत्नीने रिक्षातून खाजगी रूग्णालयात खाजगी रूग्णालयात हलविले. परंतू दोन ते तीन दिवस उपचार घेवून सुध्दा प्रकृति सुधारत नसल्याने 2 मे रोजी करणसिंग यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. परंतू त्याच दिवशी काही वेळातच उपचार घेत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.
पत्नीने दिली तक्रार
मयत करणसिंग यांच्या पत्नी मिराबाई यांनी आज मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात येवून घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच पाणी मारण्यास राजेश सांगोरे याने जबरदस्ती केली. यासोबतच बिल्डींगवर मालक रमेश सांगोरे व सेट्रींग ठेकेदार रघुनाथ कौतिक कोळी यांनी संरक्षण जाळीही लावलेली नाहीत. तर मजुर मोतीराम पावरा व दिलीप पावरा यांच्या हलगर्जीपणामुळे व्यवस्थित न पकडता तो निसटला आणि संरक्षण जाळी नसल्याने पतीच्या डोक्यात पडला. त्यामुळे हे पाचही जण पती करणसिंग यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची फिर्याद मिराबाई यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात करणसिंग यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी बिल्डींग मालक रमेश सांगारे, मुलगा राजेश, सेट्रींग ठेकेदार रघुनाथ कोळी, मजुर मोतीराम पावरा व दिलीप पावरा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.