डोक्यात फरशी घालून कामगाराचा खून

0

चिंचवड, केशवनगरातील घटना; मारेकरी फरार

पिंपरी-चिंचवड : अज्ञात व्यक्तीने डोक्यात फरशी घालून एका परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून केल्याची घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना शनिवारी रात्री चिंचवडगावातील केशवनगर भागात घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकरी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, मयताकडे मिळून आलेल्या आधारकार्डवरून त्याचे नाव राम सनेही (वय 32, रा. मध्यप्रदेश) असल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनाचे कारण मात्र, गुलदस्त्यातच आहे.

झुडुपात टाकला मृतदेह
काळेवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर खुशबू हॉटेलच्या मागे मजुरांसाठी पत्र्याचे शेड बांधले आहेत. याच ठिकाणी ही घटना घडली आहे. येथे झुडुपात एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना रविवारी सकाळी अकरा वाजता मिळाली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी येऊन पाहणी केली. बाजूला असलेल्या पत्र्याच्या खोलीसमोर रक्ताने माखलेले दगड व फरशा पडल्या होत्या. मारेकर्‍याने राम सनेही याचा खून करून मृतदेह झुडुपात टाकला होता.

साथीदाराने खून केल्याची शक्यता
प्राथमिक तपासाअंती मिळालेल्या माहितीनुसार, राम सनेही हा मध्यप्रदेशचा मूळ रहिवासी असून, तो कामानिमित्त शहरात आलेला होता. पत्र्याच्या शेडमध्ये तो एका साथीदारासोबत राहत होता. परंतु, या दोघांना परिसरातील नागरिक ओळखत नव्हते. शनिवारी रात्री दारुच्या नशेत भांडण झाल्याने साथीदाराने राम याचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात राहणारे काही कामगार तसेच ठेकेदारांची चौकशी केली. मात्र, कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.