मुंबई – कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेला सध्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाची गरज आहे. मात्र, भारताने या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. भारतानं हे निर्बंध न हटवल्यास कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या धमकीला विदेश मंत्रालयाने सणसणीत उत्तर दिले असून. सर्वप्रथम भारताजवळील गरजवंत देशांना आम्ही हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची पूर्तता करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गत दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी फोनवरुन हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले की, कुठल्याही सरकारची पहिली जबाबदारी असते ती देशातील नागरिकांची, त्यामुळे सर्वप्रथम आपल्या नागरिकांची काळजी घेणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवणे गरजेचे आहे. म्हणूनच, काही औषध-गोळ्यांच्या निर्यातीवर बंधन आणण्यात आले होते. मात्र, सद्यपरिस्थिती पाहता सरकारने १४ विविध प्रकारच्या औषधांवरील निर्यातबंदी उठवली आहे. सध्या पॅरासिटीमॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची मोठी मागणी वाढली आहे. त्यानुसार, भारतात पुरेल एवढा स्टॉक पूर्ण झाल्यानंतर या कंपन्यांशी बोलणी करण्यात येईल, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. तसेच, काही शेजारील देश पॅरोसिटीमॉल आणि हायड्रोक्लोरोक्वीन या औषधांसाठी पूर्णत: भारतावर अवलंबून आहेत. त्यामुळे प्राधान्याने या देशांना ही औषधे देण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ज्या देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण अधिक आहे, त्याही देशात या औषधांचा पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे सद्यपरिस्थितीला राजकीय चष्म्यातून कुणीही पाहू नये, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.