जळगाव । सुप्रिम कॉलनीतील विठ्ठल मंदिराजवळ सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका तरूणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्या पोटावर चॉपरने हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. पोटावर वार केल्यानंतर मोटारसायकलस्वार दोघे तेथून पसार झाले. यानंतर जखमी तरूणाला त्याच्या कुटूंबियांनी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
मोटारसायकलवरून आले दोघे…
सुप्रिम कॉलनी येथील रहिवासी विक्की रविंद्र चव्हाण (वय-19) हा सोमवारी काही कामानिमित्त सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घराबाहेर निघाला. कॉलनी परिसरातीलच विठ्ठल मंदिराजवळून 11.30 वाजता पायी जात असतांना त्यांच्या मागून मोटारसायकलवर दोन इसम आले. एकाने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली व त्याचे हात धरून ठेवले. यानंतर दुसर्याने त्याच्या हातात असलेला चॉपरने त्याच्या पोटावर वार केला. यात विक्की गंभीर जमखी झाला. जखमी अवस्टथेत विक्कीला बाजूला फेकून मोटारसायकलवरून आलेले दोघे पसार झाले. यानंतर घटना विक्कीच्या कुटूंबियांना व नातेवाईकांना कळताच त्यांनी त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अशी माहिती विक्की याने पत्रकारांशी बोलतांना दिली. दरम्यान, मिरची पावडर डोळ्यात गेल्याने वार करणारे दोघे इसम दिसले नव्हेत असे देखील त्याने सांगितले.