मुंबई । मुंबई शहर व उपनगरातील रस्त्यांवर मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग करण्याचे प्रकार वाढल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली. या मोहिमेमुळे ड्रंक अॅन्ड ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यांना आळा बसून जीवघेण्या अपघातांचे प्रमाणदेखील घटल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे. वाहतूक पोलिसांकडील आकडेवारीनुसार, गेल्या नऊ महिन्यांतील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण हे गतवर्षीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी घटले आहे. वाहतूक पोलिसांनी ड्रंक ड्रायव्हिंगविरोधी मोहीम राबवताना ब्रीथ नालायझरचा वापर सुरू केला आहे. ब्रीथ नालायझरच्या वापरापासून आमची मोहीम अधिक प्रभावी बनल्याचे वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. शहरात जानेवारी ते सप्टेंबर 2016 या कालावधीत 399 जीवघेण्या अपघातांची नोंद झाली होती. यंदा याच नऊ महिन्यांच्या कालावधीत जीवघेण्या अपघातांमध्ये घट होऊन ते 289 इतके नोंद झाले आहे.
ड्रंक ड्रायव्हिंगची 13,300 प्रकरणांची नोंद
ड्रंक ड्रायव्हर्सची तपासणी करण्याच्या मोहिमा वाढवल्याने जीवघेण्या अपघातांमध्ये घट झाल्याचे हे चित्र पाहावयास मिळाले आहे, असे सहपोलीस आयुक्त(वाहतूक) अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. चालू वर्षी आतापर्यंत ड्रंक ड्रायव्हिंगची जवळपास 13,300 प्रकरणे नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चालू वर्षाच्या सुरुवातीला वाहतूक पोलिसांनी चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत आहे, याची रस्त्यातच खातरजमा करून घेण्यासाठी नवीन ब्रिथ नालायझर प्रणाली वापरण्यास सुरुवात केली. यामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालक या दोघांचाही वेळ वाचवण्यास मदत झाली आहे. पोलिसांनी अशाप्रकारे नवनवीन प्रणालीचा वापर करून ड्रंक ड्रायव्हिंगमुळे घडणार्या जीवघेण्या अपघातांना आळा घालावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.