खडक पोलिसांची कारवाई : सहा लाखांचे हेरॉईन, चरसही जप्त
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात अमलीपदार्थांची तस्करी व विक्री करणारी लेडी डॉन आरती मिसाळच्या मुसक्या आवळण्यात खडक पोलिसांना यश आले आहे. तिच्यासह तिच्या टोळीकडून पोलिसांनी सहा लाख रुपयांचे हेरॉईन व चरसही जप्त केले आहे. तिच्याविरोधात पिंपरी आणि खडक पोलिसांत एनडीपीएस कायद्याखाली गुन्हे दाखल करून तिला अटकही करण्यात आली आहे. गेली सहा वर्षे ती पुणे पोलिसांना चकवा देत होती. चार गुंडांपासून तिला चार मुलेदेखील झाली असून, गरोदर राहण्याच्या आणि प्रसुतीच्या नंतरच्या काळात मातृत्वाचा आधार घेत ती पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होती. पुण्यातील महाविद्यालयीन तरुणाईला तिने ड्रग्जच्या व्यसनी लावल्याचेही पोलिस तपासात आढळून आले आहे.
पुण्यात कमावली बक्कळ माया
आरती मिसाळ हिच्यासह फारुख काश्मिरी, विशाल उर्फ जंगल्या सातपुते, मुकेश चव्हाण आणि रॉकी सिंग या गुंडांच्या टोळीने पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई शहरातही अमलीपदार्थ विक्री व तस्करीची टोळी सक्रीय केली आहे. गेल्या सहा वर्षात त्यांनी पुण्यात ड्रग्ज व्यवसायाचा चांगलाच जमदेखील बसविलेला आहे. त्यासाठी आरती मिसाळ ही तिची बहीण पूजा मिसाळ, भाऊ गोट्या मिसाळ आणि आणखी चार साथीदारांचे सहाय्य घेत होती. गुंडांच्या दहशतीचा आधार घेत हे टोळके शहरात ब्राऊन शुगर, चरस, हेरॉईन आदी प्रतिबंधीत पदार्थांची विक्री करत होते. त्यातून आरतीने पुणे शहरात तीन फ्लॅट, आणि चारचाकी गाड्या अशी मुबलक संपत्तीदेखील कमावली आहे.
आरतीची कसून चौकशी सुरु
लेडी डॉन म्हणून कुख्यात असलेल्या आरती मिसाळ हिचे वय 28 वर्षे असून, गेल्या 8 वर्षापासून ती अमलीपदार्थाच्या व्यवसायात सक्रीय आहे. तसेच, तिचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियांशीदेखील संबंध आहेत. चार गुंडांपासून तिला चार मुले झाली असून, लहान मुलांना पुढे करून ती अमलीपदार्थांची तस्करी करत असल्याची बाबही पोलिस तपासात पुढे आली आहे. तसेच, मुंबई ते पुणेदरम्यान तिने स्वतःचे नेटवर्क तयार केलेले आहे. पिंपरी व खडक पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिला अटक केली असून, तिची कसून चौकशी केली जात असल्याचे खडक पोलिसांनी सांगितले आहे.