ड्रायफूट दुकानदाराला 43 हजारांचा चूना

जळगाव : शासनातील लेखा परीक्षक अधिकारी असल्याचे सांगून काजू, बदामसह गावरानी तूप खरेदी करून तब्बल 43 हजारांचा मुद्देमाल घेवूनही त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी एकाविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिकारी असल्याचे भासवत गंडवले
जिल्हापेठ परीसरातील रसाळ चेंबर्स लेवा बोर्डिंगसमोर अजय रतनसी सोनी (58) हे वास्तव्यास असून याच ठिकाणी त्यांचे सोनी ड्रायफूट व जनरल स्टोअर्स नामक दुकान आहे. 6 मार्च 2018 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोनी व त्यांचा भाऊ संजस रतनसी हे दोघे दुकानात असतांना कैलास फकिरा बिरारे (रा.पोखरण रोड, ठाणे) या नावाचा व्यक्ती आला. शासनाचा विशेष लेखा परीक्षक असल्याचे सांगून जलाराम मंडळास काही वस्तू भेट द्यायच्या असल्याचे त्याने सांगितले. अशा पध्दतीने बोलता बोलता त्याने सोनी भावंडांचा विश्वास संपादन केला तसेच विशेष लेखापरीक्षक असल्याचे ओळखपत्रही दाखवले. ओळखपत्र पाहून सोने भावंडांचाही त्याच्यावर विश्वास बसला.

धनादेशाचा झाला अनादर
कैलास बिरारे याने सोनी दुकानातून 20 किलो काजू, 20 किलो बदाम व 20 किलो गावरानी तुप खरेदी करीत एकूण 43 हजारांचा सामान खरेदी केला व त्याचे पक्के बिल घेतले मात्र पैसे रोखीने न देता टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचा धनादेश दिला. सोनी यांनी हा धनादेश बँकेत टाकला असता तो वटला नाही. त्यानंतर सोनी यांनी बिरारे यांना मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधला मात्र पैसे मिळाले नाही. त्यानंतर सोनी यांनी ठाणे शहर गाठले. या ठिकाणी बिरारे यांच्या बहिणीची भेट घेतली मात्र बहिणीने त्याच्यासोबत माझा कुठलाच संपर्क नाही. उलट त्याने माझेच पैसे बुडवले असल्याचे सांगितले. त्यानंतर सोनी यांनी वेळोवेळी बिरारे यांच्याशी संपर्क साधला काही काळानंतर बिरारे याने फोन उचलणे बंद केले. तब्बल तीन वर्षांपर्यंत पैसे मिळतील याची वाट बघितली मात्र अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर सोनी यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी होऊन बुधवार, 2 मार्च रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कैलास फकिरा बिरारे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र बागुल हे करीत आहेत.