राज्य उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई ; वाहनासह 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव : लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त असलेला ‘ड्राय डे’ च्या दिवशी अवैध मद्य विक्री व वाहतूक करणार्यां विरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात आली आहे. यात पथकाने रविवारी दिवसभर विशेष मोहीम राबवून पाचोरा, वरणगाव, पिलखोड व शहरातील सुप्रीम कॉलनी आदी ठिकाणी कारवाई केली. यात एका कारसह 2 लाख 8 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव हे स्वत: रविवारी गस्तीवर होते. पुरनाड व चोरवड सिमा तपासणी नाक्यावर त्यांनी वाहनांची तपासणी केली. तेथे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. वरणगाव येथे बियरशॉपी चालकाकडून शेजारीच दुकान लावण्यात आले होते. तेथे 5 हजार 668 रुपये किंमतीच्या 36 बाटल्या जप्त करण्यात आल्या. पिलखोड, ता.चाळीसगाव येथे दुय्यम निरीक्षक सत्यजित ठेंगळे यांनी देशी,विदेशी व बियर असलेले तीन खोके जप्त केले तर सुप्रीम कॉलनीत बियरचा एक खोका जप्त करण्यात आला.
पाचोर्यात तीन ठिकाणी कारवाई
पाचोरा येथे दुय्यम निरीक्षक व्ही.एम.माळी यांच्या पथकाने हॉटेल कविता गार्डन मध्ये 2 हजार 192 रुपये किमतीची विदेशी दारु जप्त केली. तेथे लक्ष्मण विष्णू पाटील याला अटक करण्यात आली. दुसर्या ठिकाणी बढे सर संकुलासमोर चित्रा सन्यासीराव मन्थी (रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश, ह.मु.पुनगाव शिवार, पाचोर) याच्याकडे एक कार व विदेशी दारु असा दोन लाख 5 हजार 38 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसजया कारवाईत गगनसिंग कालुराम विश्वकर्मा (रा.पाचोरा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दीड हजार रुपये किमतीची देशी दारु जप्त करण्यात आली.