‘ड्रोन’ अडकला निविदा प्रक्रियेत

0

वनक्षेत्राच्या सुरक्षा आणि देखरेख प्रक्रिया सुधारण्यास दिरंगाई

पुणे : वनक्षेत्राच्या सुरक्षेबरोबरच वन्यप्राण्यांच्या विविध हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाला ड्रोन कॅमेरे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र या ड्रोन कॅमेर्‍यांची खरेदी निविदा प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे वनक्षेत्राच्या सुरक्षा आणि देखरेख प्रक्रिया सुधारण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती विभागाच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

शेकडो हेक्टरवर पसरलेल्या वनपरिक्षेत्रावर देखरेख करण्यासाठी तसेच या परिक्षेत्रातील प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाला ड्रोन आणि पीटीझेड कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये सुपे, रेहकुरी आणि भीमाशंकर या अभयारण्यासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन ड्रोन कॅमेरे तर माळढोक सर्वेक्षणासाठी दोन ड्रोन कॅमेर्‍यांना मंजुरी देण्यात आली आहे.

प्रक्रिया अपूर्ण

भीमाशंकर आणि माळढोक सर्वेक्षणासाठी प्रत्येकी दोन पीटीझेड कॅमेरे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र ही साधने विभागाच्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध नसल्याने बाहेरील कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत. यासाठी या खरेदीची निविदा काढाव्या लागणार आहेत. मात्र, अजून ही प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने पुढील प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याची माहिती मुख्य वन्यजीव वनसंरक्षक आर. के. वानखेडे यांनी दिली.

लवकरच कॅमेर्‍यांची खरेदी

केवळ वनांचे संरक्षणच नव्हे, तर इको टुरिझमच्या विकासासाठी देखील या कॅमेर्‍यांचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अनेकदा वन्यजीव संरक्षित प्रदेशात नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत नाही. झालेच, तरी ते ओझरते अथवा काही क्षणांपुरते मर्यादित असते. अशावेळी ड्रोन आणि कॅमेर्‍यांच्या सहाय्याने विविध भागांमधील प्राण्यांच्या हालचाली टिपून ते विभागाच्या केंद्रातून पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध केले जातील. यामुळे नागरिकांनाही ते प्राणी पाहण्याचे आनंद लुटता येईल. तसेच याद्वारे प्राण्यांच्या सुरक्षेवरही त्याचा चांगला परिणाम दिसेल. त्यामुळे लवकरच ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून कॅमेरांची खरेदी केली जाईल, असे वानखडे यांनी सांगितले.