ढोल-ताशा पथकांवरील निर्बंध कायम

0

पोलिसांनी दिलेल्या आदेशांना पथकांचीही सहमती

पुणे : गणपती प्रतिष्ठापना दिनी शहरात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकांनी रस्त्यावर जागोजागी थांबून बराच वेळ वादन केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक गणेश मंडळापुढे असणारे ढोलपथके आणि त्यांच्या संख्येवर पोलिसांनी मर्यादा आणली आहे. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत जागोजागी थांबून बर्‍याच वेळ वादनाचे आवर्तन करण्यास निर्बंध आणण्यात आले आहेत. हे निर्बंध मागील वर्षीप्रमाणेच आहेत, याला बहुतांश ढोल पथकांनी सहमती दर्शवली आहे. यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक वेळेवर संपते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एका पथकात फक्त 40 ढोल

एका ढोल ताशा पथकात 40 ढोल, 10 ताशा आणि 6 झांजा एवढ्याचा वाद्यांचा समावेश असेल. एका ढोल पथकामध्ये वादक, सुरक्षाकडे करणारे असे सर्व मिळून जास्तीत जास्त शंभर सदस्यांचा समावेश करावा. एका गणेश मंडळाबरोबर असलेल्या ढोल पथकास सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच ढोलपथकाला परवानगी राहील. मानाच्या गणपतीपुढे तीन ढोल पथके तर इतर गणेश मंडळापुढे दोन ढोल पथकांना परवानगी राहणार आहे. यासोबतच प्रत्येक ढोल-ताशा पथकाला लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुकीत फक्त बेलबाग चौक, उंबर्‍या गणपती चौक व अलका टॉकीज चौक या तीन चौकांमध्येच जास्तीत-जास्त 20 मिनिटे वादन आवर्तन करता येईल. याव्यतिरिक्त कोणत्याही चौकामध्ये किंवा रस्त्यावर थांबून आवर्तन करता येणार नाही.

नियमाचे पालन करण्याचे आवाहन

टिळक रोडवरील मिरवणुकीत पुरम चौक व एस.पी. कॉलेज चौक, केळकर रोडवर टकले हवेली चौक व अलका टॉकीज चौकात थांबून वादन करता येईल. विसर्जन मिरवणुकीत एका ढोल-ताशा पथकास फक्त एकाच गणेश मंडळासोबत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार आहे. तसेच सहभागी गणेश मंडळाचे विसर्जन झाल्यानंतर त्या मंडळासोबत असलेल्या ढोल-ताशा पथकाला पुन्हा नव्याने दुसर्‍या गणेश मंडळासोबत सहभागी होता येणार नाही. ढोल-ताशा पथक मिरवणूक वेळेपूर्वी पोहोचली नाही, या कारणावरून कोणत्याही गणेश मंडळांना मिरवणूक थांबविता येणार नाही. लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर प्रत्येक ढोल ताशा पथक हे जास्तीत जास्त 2 तास राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक लवकर संपविणे शक्य होणार आहे. हा आदेश पुणे शहर पोलीस दलाचे सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी काढला असून नियमाचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रमुख आदेश

एका गणेश मंडळाबरोबर एकच पथक.
एका पथकात 100पर्यंतच सदस्य असावेत.
एक पथक एकाच मिरवणुकीत सहभागी होईल.
बेलबाग चौक, उंबर्‍या गणपती चौक व अलका टॉकिज चौकात जास्तीत-जास्त 20 मिनिटेच वादन करता येईल.
मानाच्या गणपतींपुढे तीनच ढोल पथकांना परवानगी.