‘तंत्रज्ञानयुक्त अध्यापन’ या विषयावर कार्यशाळा

0

जळगाव। 21 साव्या शतकातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन प्रक्रियेत नवनवीन तंत्रांचा वापर करणे अत्यावशक आहे. आजच्या विद्यार्थ्यांना आय.सी.टीचा वापर करून शिकविले तर त्याच्या आकलन क्षमतेत वाढ होऊ शकते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मू. जे. महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘तंत्रज्ञानयुक्त अध्यापन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गुजरात येथील भावनगर विद्यापीठातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ. दिलीप बारड मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. इंटरनेटचा वापर करून ब्लॉग, एडटीईडी डॉट कॉम, गुगल फॉर्म, ई-मेल यांचा तसेच विविध लिंक्सचा प्रभावी वापर करून प्राध्यापकांना परिणामकारक अध्यापन करता येते.

सहभागी प्राध्यापकांचे ब्लॉग सुरू
सकाळच्या सत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्राध्यापकांचे ब्लॉग सुरु करण्यात आले. त्यात शिक्षकांनी आपले शैक्षणिक साहित्य कसे अपलोड करावे व विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोग होऊ शकतो याविषयीचे प्रात्यक्षिक सहभागी प्राध्यापकांनी केले. महाविद्यालयातील 30 प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले. आजच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अध्यापन करणे अनिवार्य आहे असे ते म्हणाले. यावेळी विभागप्रमुख डॉ.बी.एन.केसूर,कार्यशाळेचे समन्वयक प्रा.पंडित चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अनिल क्षीरसागर यांनी केले.