हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ
राजगुरुनगर : अनेक शिक्षणसंस्था ज्ञानदानाचे कार्य प्रभावीपणे करीत असल्या तरी समाज व उद्योगाची गरज ओळखून तंत्रज्ञानाधारित व कौशल्याभिमुख शिक्षणाची खर्या अर्थाने आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तृतीय पदवीदान समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड.देवेंद्र बुट्टेपाटील होते.याप्रसंगी संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्रा. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी हरिप्रसाद खळदकर आणि कला, वाणिज्य, विज्ञान, बी.सी.एस., बी.सी.ए. या शाखांतील पदवीदान करणारे 145 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीता डोंगरे यांनी, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी तर आभार उपप्राचार्य व परीक्षाधिकारी प्रा. व्ही. डी. कुलकर्णी यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी नव्या वाटा शोधाव्यात
गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर बौध्दिक शिक्षणाला सामाजिक, आर्थिक जोड द्यायला हवी. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या सेवा देता आल्या पाहिजे. यासाठी शिक्षणसंस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावताना विद्यार्थी ग्राहक मानून त्याला सर्वोत्तम गुणवत्ताधारित शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. विद्यार्थ्यांनी पदवीशिक्षण हे पाया मानून ध्येयवादी वृत्तीने, नियोजनबध्दपणे आपल्या करिअरला दिशा द्यायला हवी. या करीता विद्यार्थ्यांनी मळलेल्या वाटा सोडून नव्या वाटा शोधायला हव्यात. सध्याच्या काळात पारंपरिक शिक्षणाबरोबरच दर्जेदार संगणकीय शिक्षण, एखादी परदेशी भाषा, अॅनिमेशन, ट्रॅव्हल टुरिझमसारखे शिक्षण घेतले तरच विद्यार्थांना यशस्वी होण्याची संधी आहे, असे ते म्हणाले. विद्यापीठ अनुदान आयोग व इतर विद्यापीठांच्या वेबसाइटला भेट देऊन नेमकेपणाने संधीचा शोध घ्या. प्रयत्नवादी राहा असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.
कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी संस्थेच्या वतीने कौशल्याभिमुख शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागाच्या वतीने कौशल्याधारित अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या पलिकडचे शिक्षण मिळावे यासाठी कार्यानुभवावर आधारित क्षेत्रीय भेटींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचा सन्मान
महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी हर्षद वाडेकर याचा महाराष्ट्र शासनाचा वेटलिफ्टिंगमध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. प्राणीशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल प्रियंका मुळे या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठ मधुरा वाघ व सुवर्णा अरकेरी या विद्यार्थिनींनी सादर केले.