तक्रारदार महिलेची छेड काढणार्‍या पोलीस निलंबित

0
पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची कारवाई
पिंपरी : पतीसोबत भांडण झाल्याने तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेलेल्या महिलेची जुजबी तक्रार घेऊन त्यानंतर रात्री-अपरात्री फोन करून तिचा विनयभंग करणार्‍या सहाय्यक फौजदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. रामनाथ पालवे असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव असून त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पालवे हा चिखली ठाण्याअंतर्गत येणार्‍या साने चौकीत सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहे. तर, तक्रारदार महिला एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे. तिचे पतीबरोबर भांडण झाले होते. त्यामुळे ती महिला तिच्या मुलाला घेऊन तक्रार देण्यासाठी बुधवारी (दि.11) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास साने चौकीत गेली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सहाय्यक फौजदार पालवे याने महिलेची जुजबी तक्रार नोंदविली.
त्यानंतर त्या महिलेने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मध्यरात्री रामनाथ पालवे याने संपर्क केला. तिच्याशी बोलताना अश्‍लिल भाषेचा वापर करून महिलेचा विनयभंग केला. या प्रकारानंतर संबंधित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी संबंधित सहाय्यक पोलीस फौजदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी तातडीने पालवे याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे आळा बसेल
नव्याने तयार झालेल्या या ठाण्याचे घटस्थापनेच्यामुहुर्तावर उद्घाटन करण्यात आले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही पोलीस चौकी बनविली असून यामध्ये नागरिकांचे संरक्षण महत्वाचे आहे. मात्र पोलीस ठाण्यातील आपल्या अधिकारांचा गैरवापर करून ही सहाय्यक फौजदारांनी महिलेला असा त्रास देणे चुकीचे आहे. अधिकार्‍यांनी असा गैरवापर करणे हे कायद्याच्या विरूद्ध असल्याने आयुक्त एस.के.पद्नाभन यांनी तडकाफडकी या पोलिसाला निलंबित करण्याची योग्य कारवाई केली. आयुक्तांच्या या आदेशामुळे अन्य पोलीस अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करणार नाहीत. अशा प्रकारांना आळा बसेल.