साकेगावचे ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्तीनंतरही दप्तरातील नोंदी करताहेत पूर्ण
भुसावळ- साकेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्तीनंतरही आपल्या कार्यकाळात अपूर्ण ठेवलेल्या दप्तरातील नोंदी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये हजेरी लावत आहेत तसेच ग्रामविकास अधिकारी विरूद्ध गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही चौकशी न करताच सेवानिवृत्ती देण्यात आली. हा प्रकार चुकीचा असून वरीष्ठांकडे तक्रार केली जाणार असल्याचे तक्रारदारांने सांगितले.
सेवानिवृत्तीनंतर नोंदी होत असल्याने आश्चर्य
साकेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस.आर. चौधरी 30 जुन रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रीक्त झालेल्या जागेवर गटविकास अधिकारी एस.बी.मावळे यांनी मुंडके यांच्याकडे पदभार सोपवला आहे मात्र असे असूनही सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी एस.आर.चौधरी आपल्या कार्यकाळातील शासकीय दप्तरातील अपूर्ण नोंदी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये हजेरी लावीत असल्याने या मागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे तसेच सदरहू ग्रामविकास अधिकार्यांविरूद्ध 25 सप्टेंबर 2017 रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीचा अर्ज देवूनही चौकशी न करता ग्रामविकास अधिकार्याला सेवानिवृत्त करण्यामागचे कारण काय ? याबाबतीत वरीष्ठांकडे तक्रार केली जाणार असल्याचे तक्रारदार दीपक चौधरी यांनी सांगितले.
कार्यकाळ संशयाच्या भोवर्यात
सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी एस.आर.चौधरी यांचा साकेगाव ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ संशयाच्या भोवर्यात आहे. यामुळे ते ग्रामपंचायतीच्या दप्तरातील अपुर्ण नोंदी पुर्ण करण्याचा खटाटोप करीत असल्याने या प्रकरणाची चौकशी पुर्ण होईपर्यंत त्यांना सेवानिवृत्तीची रक्कम अदा करण्यात येवू अशी तक्रार केली जाणार आहे.