तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांची पोलिस ठाण्यात ‘फ्रीस्टाईल’

0

जळगाव । शहर पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी 1 वाजता परस्पराविरूध्द तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन्ही महिलांची पोलिस ठाण्यात फ्रिस्टाईल झाल्याची घटना घडली. यात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत भांडण सोडवून त्यांना ताब्यात घेतले. यानंतर दोन्ही महिलेंसह एका विरूध्द 160 प्रमाणे पोलिसांनी कारवाई केली. गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी असलेला दिनेश यशवंत अंभोरे याने काही वर्षापूर्वी सोनी ह्या महिलेशी विवाह केला होता.

परस्परांविरूध्द तक्रार देण्यासाठी आल्या महिला
तिला लग्नानंतर काही वर्षातच तिला माहेरी पाठवून दिले होते. त्यानंतर त्याने कविता ह्या महिलेशी लग्न करून तो गेंदालाल मिल येथेच राहत होता. तीन-चार दिवसांपूर्वी सोनी ही महिला मुलाल घेवून दिनेश याच्याकडे आली व मुलाचा सांभाळ करावा अशी मागणी केली परंतू यावरून कविता व सोनी या दोघींमध्ये वाद झाले. यानंतर आज रविवारी सोनी अंभोरे ह्या मंगलाबाई गोपाळ यांच्यासोबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या. त्याच पाठोपाठ दिनेश व त्याची पत्नी कविता हे देखील तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. सोनी अंभोरे ह्या तक्रार देत असतांना कविता हिने तिच्याशी वाद घालत कानशिलात लगावली. यानंतर दोघांमध्ये पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर फ्रिस्टाईल होवून शिवीगाळ झाली. हाणामारी सुरू असतांना दिनेश याने सोनी हिला मारहाण केली.

पोलीस ठाण्यात महिला कर्मचारी नसल्याने ठाणे अंमलदार अविनाश कांबळे, पोलिस कर्मचारी अकरम शेख, भुषण पाटील, जयेंद्रसिंग पाटील, रुस्तम तडवी, युनूस तडवी आदींनी मंगलाबाई गोपाळ व सिताबाई अंभोरे यांच्या मदतीने दोन्ही महिलांच्या भांडणात हस्तक्षेप करत त्यांचे भांडण सोडवत त्यांची समजूत घातली. तिघांना ताब्यात घेत पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांच्या समोर हजर करण्यात आले. यानंतर पोलिस कर्मचारी भुषण हरिषचंद्र पाटील ह्या पोलिस कर्मचार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनी दिनेश अंभोरे, दिनेश अंभोरे, कविता दिनेश अंभोरे यांच्याविरूध्द 160 प्रमाणे कारवाई केली.