जमा केलेल्या तक्रार पेट्या पुन्हा वाकड परिसरात अडकवल्या
पेटीतून समस्या मांडण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन
पिंपरी : तक्रार पेटी वारंवार फिरती राहिल्याने नागरिकांकडून येणार्या तक्रारींना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एका ठिकाणी दोन दिवस आणि काही दिवसांनी आठवडाभरासाठी तक्रार पेटी ठेवण्याचे ठरले. तक्रारपेटी आठवडाभर एका जागेवर ठेवली तरीही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्षच केले. तक्रार पेटी ठेवण्याचा कालावधी कमी आणि तक्रार पेट्यांची संख्या कमी असल्याने तक्रारी येत नाहीत, असे नागरिकांकडून सांगण्यात आल्याने त्यावर उपाययोजना करत एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत 70 तक्रार पेट्या ठेवण्यात येत आहेत. शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. चोर्या, मारामारी, खून, मंगळसूत्र चोरी यांचे प्रमाण वाढते आहे. अनेकदा गुंडांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यास घाबरतात. त्यासाठी या तक्रारपेट्या शहरात जागोजागी पोलीस आयुक्तालयाद्वारे लावण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा
पोलीस आयुक्तांची संकल्पना
महिलांवरील अत्याचार, चोर्या आणि अन्य प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात फिरती तक्रारपेटी ही संकल्पना सुरु केली. ज्यामध्ये नागरिकांना त्यांच्या तक्रारी निनावी टाकता येणार होत्या. त्यानुसार 70 तक्रार पेट्या शहर परिसरात बसविण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यांकडे किमान सात पेट्या दिल्या. या पेट्या संबंधीत पोलीस ठाणे हे सोसायटी आणि शाळांमध्ये बसवत असत. यासाठी पोलीस तेथे जाऊन जनजागृती करत. पेट्यांबद्द्ल माहिती देत व आठ दिवसांनंतर तेथील तक्रारींचा आढावा घेतला जात होता. असे असनूही नागरिकांनी मात्र या पेट्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे डिसेंबर महिन्यात नागरिकांकडून तक्रारी अगदी कमी आल्याने पोलीस आयुक्तालयाकडून सर्व तक्रारपेट्या जमा करण्यात आल्या.
पुढाकार घेणे गरजेचे
याबाबत पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन म्हणाले की, पोलीस नागरिकांच्या समस्या वेगवेगळ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी देखील त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तक्रार पेट्यांच्या माध्यमातून त्यांच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे. तक्रार पेटीत तक्रार टाकण्यासाठी नाव टाकण्याची सक्ती नाही, निनावी देखील तक्रारी करता येणार आहेत. तक्रार पेट्यांची संख्या कमी असल्याने सर्व तक्रार पेट्या एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसवून तक्रार पेट्यांची संख्या वाढवून तक्रारी जमा करण्यात येणार आहेत.