तक्रार मागे घेण्याच्या वादातून मारहाण : दोघांविरोधात गुन्हा

A man was stabbed in Bhusawal due to a dispute over withdrawing a police complaint भुसावळ : गतवर्षी पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, यासाठी शहरातील बहिराम बाबा मंदीराजवळील वेडीमाता रोडवर शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास एकावर चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत राजू वसंत सपकाळे जखमी झाले. याप्रकरणी विशाल दिलीप सूर्यवंशी (रा.कोळीवाडा, भुसावळ) व प्रकाश उर्फ खन्ना एकनाथ कोळी (रा.भिरूड कॉलनी) यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न केला म्हणून शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून चाकू हल्ला
जुन्या वादावरून शनिवारी रात्री 7.30 वाजता बहिराम बाबा मंदिराजवळ तसेच वेडीमाता रोडवर राजू सपकाळे (रा.न्यू हुडको कॉलनी, भुसावळ) यांच्यावर विशाल दिलीप सूर्यवंशी (रा.कोळीवाडा, भुसावळ) व प्रकाश उर्फ खन्ना एकनाथ कोळी (रा.भिरूड कॉलनी) यांनी चाकूने डोक्याजवळ वार केला. गतवर्षी तेजस राजू सपकाळे याने केलेली पोलिस केस मागे घ्यावी, यासाठी तेजस याचे वडील राजू सपकाळे यांच्यावर चाकूने वार केला. तसेच चापटा, बुक्यांनी मारहाण केली. यात राजू सपकाळे हे गंभीर जखमी झाले आहे. तसेच रात्री आठला सुध्दा मारहाण केली. संशयीत विशाल दिलीप सूर्यवंशी यांने सपकाळे याला तु माझ्या विरूध्द केलेली तक्रार मागे घे, केस न काढल्यास तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. पोलिस ठाण्यात विशाल सूर्यवंशी व प्रकाश उर्फ खन्ना कोळी यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी पुढील तपास करीत आहे.