शिंदखेडा । तालुक्यातील दत्तवायपूर येथे भीषण पाणी टंचाईची झळ नागरिकांसोबत मुक्या जनावरांना देखील भेडसावत आहे. शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न ग्रा.पं.ने केले. मात्र जनावरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गावातील ‘संकलेचा’ कुटुंब सरसावले आहे. संकलेचा परिवारातर्फे भूतदया दाखवत जनावरांसाठी गावहाळात रोज तीन टँकरद्वारे पाणी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले जात आहे.
विटाई व चांदगडसाठी देखील भूतदया
संकलेचा परिवाराच्या या सामाजिक उपक्रमास अंबादास पाटील, हिंमत पाटील, नाना पाटील, दत्तात्रय पाटील, पुंजू पाटील, बापूराव पाटील, नाना माळी, निळकंठ ाटील, बळवंत पाटील, शिवाजी पाटील, दादू खैरनार व ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. संकलेचा कुटुंबाने आपण सामाजिक उपक्रम गावापुरताच मर्यादित न ठेवता गावालगत असलेल्या विटाई आणि चांदगउ या गावातील जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही गावातील गावहाळात रोज एक टँकर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
धरण परिसरातून पाण्याची उपलब्धता
दत्त वायपूर गावापासून साधारणतः चार किलो मीटर अंतरावर असलेल्या बामळे फाटा व वाघाडी गावाच्या परिसरातील विहीरींवरून संकलेचा कुटुंब पाणी उपलब्ध करून देत आहे. या परिसरातील सोनवण व जामफळ धरणातील कमी साठ्यामुळे बामळे व वाघाडी परिसरातील विहिरी जीवंत आहेत. या परिसरातील शेतकर्यांचा संकलेचा कुटुंबाच्या सामाजिक उपक्रमास हातभार लागत आहे.
पाणीपुरवठा करणारे सर्व स्त्रोत आटले
दत्तवायपूर येथे जानेवारीपासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील पाणीपुरवठा करणारे सर्व स्त्रोत आटले आहेत. यामुळे गावास दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीने नवीन पाणी योजना व टँकरचा प्रस्ताव दिला आहे. मात्र सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून ग्रामस्थांसोबतच जनावरांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. ही अडचण लक्षात घेवून गावातील भूषण हुकूमचंद संकलेचा व परिवाराने जनावरे व पशू-पक्ष्यांप्रती आपली सहवेदना दाखवत गावातील हाळात स्वखर्चाने रोज तीन टँकर पाणी उपलब्ध करून दिले आहे. याबद्दल ग्रामस्थांनी संकलेचा कुटुंबाचे आभार मानले आहेत. संकलेचा परिवाराच्या या उपक्रमामुळे मुक्या जनावरांना उन्हाळ्यात पाण्याची पुर्तता होत असल्याने नागरिकांमधून त्यांच्याप्रती आभार व्यक्त केले जात आहेत.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जातात मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून समाजमन पुढे येणे गरजेचे आहे. हीच सामाजिक ऋण म्हणून वायपूरसह, विटाई, आणि चांदगड गावातील जनावरांसाठी रोज पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ग्रामस्थांचे व शेतकर्यांचे सहकार्य मिळत आहे.
– भूषण संकलेचा