तप्त उन्हाळ्यात तहानलेल्या शेंदुर्णीला दिलासा

0

शेंदूर्णी । गेल्या अनेक दिवसांपासून शेंदुर्णीत पाणी प्रश्‍नाने उग्र रूप धारण केले होते. पाण्याअभवी नागरिकांचे प्रचंड हाल होत असताना तसेच हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे असताना अशातच आता काही पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शेंदुर्णीत अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शेंदुर्णीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावावर ओढवलेल्या भीषण पाणी टंचाई संकटात मिळत असलेल्या मोफत पाणी पुरवठ्याच्या मदतीमुळे समाजसेवक व संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या या उपक्रमाचे सर्व स्तरातील नागरिक स्वागत करीत आहेत.

पाच वर्षातील प्रश्‍न गंभीर
नागरिकांना गेले पांच वर्षांत प्रथमच तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलासह बालगोपाल 45 डिग्री तापमानात सुध्दा वणवण भटकून पाणी आणत आहे. गोंदेगाव धरणाच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आटल्याने व गलवाडा धरणातून पाणी उपसा करण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा उपलब्ध होत नसल्याने शेंदूर्णी करांवर पाणी बाणी संकट ओढवले आहे त्याचा सामना करतांना नागरपंचायतीस आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. तरीही गावातील काही भागात विसाव्या दिवशी का होईना नळाद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात नागरपंचायतीस यश आले आहे.

मोफत पाणीपुरवठा
गावांतील पाणी समस्येवर मात करण्यासाठी व अश्या संकट समयी नागरिकांना दिलासा देतानाच सामाजिक बांधिलकी जपत येथील पारस जैन पतसंस्थचे चेअरमन प्रकाश झंवर त्यांचे सहकारी सर्व संचालक व महावीर ऑईल इंडस्ट्रीजचे संचालक शांतीलाल जैन यांच्यावतीने नागरिकांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच येथील आचार्य गजाननराव गरुड पतसंस्थेचे अध्यक्ष संजय गरुड व त्यांच्या संचालक मंडळाचे वतीनेही गावातील गल्ल्या गल्ल्या मधून टँकरने मोफत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु या पाणीटंचाई प्रसंगी शुद्ध पाण्याच्या नावावर एरवी 20 रुपयांची मिळणारी जार 30 रुपयास व हंडाभर पाण्यासाठी 10 रुपये वसूल करणारे काही चमको अ‍ॅक्वा प्लान्ट वाले मोफत जलसेवा पुरविण्याची बॅनर बाजी करीत असल्याने नागरिकांनी त्याविषयी रोष व्यक्त केला आहे.

अनेकांचा पुढाकार
टप्प्या टप्प्याने पाणीटंचाई दूर करण्यासाठी काही वेळ लागू शकतो याचा विचार करून अश्या कठीण परिस्थितीत येथील माजी उपसरपंच गोविंदभाई अग्रवाल यांनी गावकर्‍यांची पाण्याची तहान भागविण्यासाठी स्वत: तसेच भाडे देऊन उपलब्ध केलेल्या 3 टँकरने गावांतील प्रत्येक वार्डात मोफत पाणी पुरवठा करून दिलासा देण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. त्याच प्रकारे स्व. आबासाहेब काशिनाथराव गरुड यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच निर्मलाताई गरुड व अमरीश गरुड हे स्वखर्चाने नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी मदत करीत आहे. येथील अनेक सामाजिक कार्यकर्तेही नागरिकांची पाण्याची तहान भागविण्यासाठी टँकरने मोफत पाणीपुरवठा करीत आहे.