तप जीवनाचा प्राण -डॉ.ज्ञानप्रभाजी म.सा.यांचे विचार

0

जैन बांधवांच्या पचकावणीनिमित्त भुसावळात रविवारी मिरवणूक

भुसावळ- तप जीवनाचा प्राण असून धर्म, संस्कृती व राष्ट्रासह विश्‍वाचा विकास हा तपावर आधारीत असल्याचे विचार पू.डॉ.ज्ञानप्रभाजी म.सा.यांनी येथे व्यक्त केले. शहरातील सुराणा साधना भवनात प.पू.डॉ.ज्ञानप्रभाजी म.सा.यांच्या चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. सूर्यादयानंतर ते सूर्यास्तापर्यंत केवळ गरम पाणी पिवून तब्बल 31 दिवस उपवास करणार्‍या हितेश जयंतीलाल सुराणा व रमेशजी कोठारी यांच्या स्नुषा मंजुबाई अजितकुमार कोठारी यांच्या तपाचे ज्ञानप्रभाजींनी प्रसंगी कौतुक केले.

…तर स्वर्गातील देवताही त्यांना करतात नमस्कार
ज्ञानप्रभाजी म्हणाल्या की, देशाची संस्कृती ऋषी आणि कृषीवर आधारीत आहे. ऋषी-मुनी आपल्याला संयम आणि तपाच्या बळावर सर्वशक्ती संपन्न बनवतात. अहिंसा, संयम व तप ज्याच्या जीवनात आहे त्यांना स्वर्गाचे देवताही नमस्कार करतात, असेही त्या म्हणाल्या. तप म्हणजे केवळ भूकेला शमन करणे नव्हे तर आपल्या इंद्रियांवर नियंत्रण करणे हा तपाचा उद्देश आहे. जैन धर्मात तप हे एक विशिष्ट कोटीचे तप आहे. या उपवासात सूर्यादयानंतर ते सूर्यास्तापर्यंत केवळ उकळलेले गरम पाणी पिले जाते शिवाय रात्री पाण्याचा एक थेंबही चालत नाही व आहार-संज्ञावर मात करून हे तप केले जाते, असेही त्या म्हणाल्या.

पचकावणीनिमित्त रविवारी मिरवणूक
शहरातील उद्योगपती स्व.शांतीलाल सुराणा यांचे नातू तसेच जयंतीलाल सुराणा यांचे पूत्र हितेश सुराणा तसेच रमेशजी कोठारी यांच्या स्नुषा मंजुबाई अजितकुमारजी कोठारी यांच्या 31 दिवसांच्या उपवासाच्या सांगतेनिमित्त रविवार, 26 रोजी शहरातील अष्टभूजा मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. संतोषी माता हॉलमध्ये होणार्‍या कार्यक्रमास आयएएस अधिकारी सुधीर कोचर, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार राजू मामा भोळे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.