नवी दिल्ली – निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दिल्लीतील एकाच इमारतीतील २४ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे दिल्लीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या संपूर्ण निजामुद्दीन परिसर सील करण्यात आला असून परिसरातील अनेकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच शेकडो लोकांच्या टेस्ट करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला हजारो जणांची उपस्थिती होती. त्यापैकी अनेकांनी देशभरातील विविध ठिकाणी भेटी दिली असल्याचे वृत्त असल्यादे दिल्लीसह केंद्र सरकारदेखील हादरले आहे.
दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलमध्ये सध्या करोनाचे १७४ रुग्ण दाखल आहेत. यापैकी १६३ जण हे निजामुद्दीनमधील आहेत. रविवारी ८५ जणांना दाखल करण्यात आले. तर सोमवारी ३४ जण दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मैलानाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मरकजच्या मौलानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन असतानाही मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आणि त्याची परनावगीही न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.