कुठेतरी प्रवास करीत असताना, कडे कपार्या चढत ट्रेकिंग करीत असताना किंवा समुद्रामार्गे सफर करण्यास निघालेले असताना एखादे पती-पत्नीचे जोडपे अचानक गायब झाल्याच्या घटना आपण वर्तमानपत्रातून वाचतो किंवा टीव्हीवर पाहतो. हे पाहताना सर्वात चांगली गोष्ट असते ते म्हणजे ते जोडपे सुखरूप असणे, ही. पण कधी कधी असे घडत नाही. काही प्रसंगी त्या जोडप्याला आपले प्राण गमवावे लागतात, तर क्वचित प्रसंगी त्या जोडप्याचे नक्की काय झाले या प्रश्नाचे उत्तर कोणालाच मिळत नाही. असे प्रसंग घडत असलेले आपण पाहत-वाचत असतो. पण ही कहाणी आहे अशा जोडप्याची, ज्यांचे मृतदेह तब्बल पंच्चाहत्तर वर्षांनी सापडले आहेत. हे दोन्ही मृतदेह बर्फामध्ये गोठलेल्या अवस्थेत सापडले आहेत.
मार्सेलीन आणि फ्रान्सीन दुमोलीन अशी या जोडप्याची नावे आहेत. हे जोडपे स्वित्झर्लंडचे रहिवासी असून, 1942 साली त्यांना आल्प्स पर्वतराजीमध्ये शेवटचे पहिले गेले होते. या जोडप्याला सात अपत्ये होती. जिथे हे जोडपे, अनेक वर्षांपूर्वी बर्फाखाली दबून गेले होते, तेथील बर्फ वितळायला लागल्यानंतर या जोडप्याच्या मृतदेहांचा शोध, 2017 च्या जुलै महिन्यात लागला आहे. एक दिवस मार्सेलीन आणि फ्रान्सिन आपल्या पाळीव गाईंना चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेले आणि पुन्हा परतलेच नाहीत. ते जेव्हा बेपत्ता झाले तेव्हा घरामध्ये त्यांची सात लहान मुले मागे होती. आपले आईवडील परत आले नाहीत हे त्यांनी इतरांना सांगताच त्यांचा मित्र परिवार, नातेवाईक, सर्वांनीच मार्सेलीन आणि फ्रान्सीनचा पुष्कळ शोध घेतला, पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. मार्सेलीन आणि फ्रान्सीन परत येणार नाहीत हे कळून चुकल्यामुळे ती सातही भावंडे एकमेकांपासून दूर होऊन वेगवेगळ्या परिवारांच्या आश्रयाला गेली. पण त्या भावंडांनी आपल्या आईवडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. या जोडप्याचे मृतदेह देब्लर्टस् पर्वतावरील वितळत असलेल्या हिमनदीमध्ये सापडले. बर्फामध्ये गोठून राहिल्यामुळे या मृतदेहांची कुठल्याही प्रकारे वाताहत झालेली नव्हती. त्यांच्या मृतदेहांच्या जवळच त्यांचे बॅकपॅक, एक काचेची बाटली, एक पुस्तक आणि एक घड्याळ असे सामानही सापडले आहे. हे मृतदेह नक्की मार्सेलीन आणि फ्रासीन यांचेच आहेत हे सिद्ध करण्यासाठी डीएनए परीक्षण ही केले जाणार आहे. जिथे मार्सेलीन आणि फ्रान्सीनचे मृतदेह सापडले त्या हिमनदीवर स्कीईंग करण्याकरिता अनेक पर्यटक येत असतात. इथे एक रिसोर्ट असून एका स्कीईंग कंपनीद्वारे इथे स्कीईंग करवण्यात येते. याच स्कीईंग कंपनीच्या कर्मचार्यांना हे दोन्ही मृतदेह बर्फामध्ये गोठलेल्या अवस्थेत सापडले. आधी कर्मचार्यांना फक्त बॅक पॅक, टिनच्या वाट्या, एक बाटली आणि एका पुरुषाचे आणि एका महिलेचे बूट सापडले.
या वस्तू कुठून आल्या याचा शोध घ्यायचा प्रयत्न करीत असताना दोन्ही मृतदेहांचा शोध लागला. त्यांच्या कपड्यांवरून, ते मृतदेह साधारण सत्तर ती ऐंशी वर्षांपूर्वीचे असावेत, असा कयास लावला गेला. येथे आलेले असताना येथील एका खोल खड्ड्यात हे जोडपे पडले असावे आणि बाहेर निघता न आल्यामुळे त्या खड्ड्यातच त्या दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. मार्सेलीन आणि फ्रान्सीन हे दाम्पत्य क्वचितच एकत्र घराबाहेर पडत असे त्यांची मुले सांगतात. परिवार मोठा असल्यामुळे फ्रान्सीनचा वेळ मुलांची देखभाल करण्यात जात असे. मार्सेलीन यांचा बूट बनवण्याचा व्यवसाय होता, तर फ्रान्सीन शिक्षिका होती. आपल्या गायींना चरण्यासाठी हे दोघे घेऊन गेलेले असताना हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.