धुळे शासकीय रुग्णालयात होते उपचारार्थ दाखल ; डिचार्ज होवून कारागृहात रवानगी
जळगाव : घरकूल प्रकरणाचा निकाल लागल्यापासून वैद्यकीय कारण समोर करत लता भोईटे, साधना कोगटा, सुधा काळे, अलका लढ्ढा, मीना वाणी, विजय कोल्हे हे उपचारार्थ भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होते. बुधवारी डिचार्ज झाल्यानंतर त्यांना धुळे कारागृह प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यांची गुरुवारी सकाळी नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तब्बल 40 दिवसानंतर 10 रोजी पाचही गुन्हेगार नाशिक कारागृहात दाखल झाले.
घरकुल प्रकरणात धुळे विशेष न्यायालयाने 31 ऑगस्ट रोजी निकाल दिला. यात सर्व 48 गुन्हेगारांना दंड तसेच शिक्षा ठोठावण्यात आली. याच दिवशी वैद्यकीय उपचाराचे कारण समोर करत शिक्षा सुनावण्यात आलेले गुन्हेगार लता भोईटे, साधना कोगटा, सुधा काळे, अलका लढ्ढा, मीना वाणी, विजय कोल्हे हे धुळे हिरे शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. कुठलाही आजार नसतांना राजकीय दबावातून ते रुग्णालयात दाखल झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. यादरम्यान संशयितांना दाखल केलेल्या जामीन अर्जावर कामकाजावेळी खंडपीठाने उपचार घेणार्या गुन्हेगारांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. यानंतर लता भोई यांनी रुग्णालयातून डिचार्ज घेतला होता. यानंतर 9 रोजी उर्वरीत साधना कोगटा, सुधा काळे, अलका लढ्ढा, मीना वाणी, विजय कोल्हे यांना डीचार्ज देण्यात आला. व धुळे कारागृहाच्या ताब्यात देण्यात आले. धुळे कारागृहाने त्यांना नाशिक कारागृह पोलिसांच्या ताब्यात देवून रवानगी करण्यात आली.
खंडपीठाला माहिती पाठविण्यात आली
शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर लता भोईटे, साधना कोगटा, सुधा काळे, अलका लढ्ढा, मीना वाणी, विजय कोल्हे हे गुन्हेगार राजकीय दबावातून रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वृत्तपत्रांनी प्रकाशित केले होते. या प्रकारानंतर खंडपीठाने याबाबत हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र पाठवून उपचार घेणार्या रुग्णांना आजार, काय उपचार केले यासह प्रत्येकाच्या वार्डचे सीसीटीव्ही फुटेज अशी माहिती मागविली होती. ही सर्व माहिती खंडपीठाला पाठविण्यात आल्याचे धुळे वैद्यकीय महाविद्यालायचे पर्यवेक्षक डॉ. भूषण राव यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.