आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकाधिक कामे उरकण्यासाठी महापालिका स्थायी समितीचा कोट्यवधी रुपयांचा धडाका
पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकाधिक कामे उरकण्यासाठी महापालिका स्थायी समितीने कोट्यवधी रुपयांचा धडाका केला. स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी दि. 4 रोजी तब्बल 126 प्रस्ताव आणि सुमारे 120 कोटी रुपयांच्या खर्चांची कामे मंजूर करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 50 कोटी रुपयांचे प्रस्ताव ऐनवेळी दाखल करून मंजूर करण्यात आले. सभेच्या सभापती विलास मडिगेरी अध्यक्षस्थानी होते. स्थायी समितीसमोर नियोजित १५७ कोटींचे विषय मंजुरीसाठी होते. त्यापैकी स्थायी समतिीने 1 कोटी 3 लाखांचे सहा अवलोकनाचे, तर 68 कोटी 29 लाखांचे 99 खर्चाच्या प्रस्तावांना मान्यता दिली. याबरोबर स्थायी समितीने आयत्यावेळी 21 प्रस्ताव दाखल करून घेतले. त्यासाठी एकूण 50 कोटी 58 लाख रुपयांचा खर्च ऐनवेळी स्थायीने मान्यता दिली.
या कामांचा देखील समावेश…
आकुर्डीतील नाट्यगृहाचे उर्वरित कामे करण्यासाठी २४ कोटी, चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह व मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 9 कोटी यासह आकुर्डीत पालखी मार्गाचे डांबरीकरण, नाशिक फाटा ते वाकड आणि सांगवी ते किवळे बीआरटी मार्गांसाठी ऑटोमॅटिक डोअर सिस्टिम बसविणे निगडी जलशुद्धीकरण केंद्र व रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रावर कंत्राटी पद्धतीने कुशल कर्मचारी नियुक्त्तीच्या महत्त्वाचे विषय मंजूर करण्यात आले.
जलशुध्दीकरण केंद्रावर मंथन सुरूच
आंद्रा व भामा-आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्राचे संकल्पचित्र व अन्य कामे करणे, देखभाल दुरुस्ती या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी प्रकल्प बांधणे व देखभालीसाठी मिळून ८० कोटींचा खर्च आहे. परंतु, सद्यस्थितील निगडीतील प्रकल्पाची माहिती अधिका-यांनी नीटपणे न दिल्याने हा प्रस्ताव दुस-यांदा तहकूब करण्यात आला. त्यासह पूरग्रस्त नागरिकांना चादर, ब्लॅंकेट्स व अन्य वस्तूंचे वाटप करण्याचा आणि व्यापारी गाळे भाडेतत्वावर देण्याचा प्रस्तावही स्थायीने तहकूब ठेवला.