प्रेरणा बँकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आयुक्तांचे प्रतिपादन
पिंपरी : स्वच्छतेकडे वैयक्तिक कर्तव्य म्हणून न पाहता गरज म्हणून पाहीले पाहिजे. आरोग्यपूरक वातावरण निर्माण केले तरच आपण समाजाचा सन्मान केला असे होईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. प्रेरणा को. ऑप बँकेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्वछ भारत अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. प्रेरणा बँक, प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था, प्रेरणा शिक्षण संस्था आणि प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर, चेअरमन कांतीलाल गुजर, व्हाईस चेअरमन गबाजी वाकडकर, संचालक लक्ष्मण काटे, श्रीधर वाल्हेकर, अंकुश पर्हाड, सुरेश पारखी, राजाराम रंदिल, नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रभागा भिसे, संजय पठारे, राजेंद्र शिरसाठ, उमेश आगम, सुजाता पारखी, मीना शेळके, शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी विलास दसाडे, प्राचार्य यशवंत पवार, कैलास पवळे, राजकुमार सरोदे, सुनील सोनवणे, महेंद्र पवार, शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले, बँकेचे सी. ई. ओ. तानाजी सोनवणे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी लक्ष्मण बेहरे व बँक, पतसंस्था, शाळांचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी व मित्र परिवार या मोहिमेत सहभागी झाले होते.
स्वच्छतेचे रक्षक बनले पाहिजे!
महापालिका आयुक्त पुढे म्हणाले, आपण स्वच्छतेचे रक्षक बनले पाहिजे. इतरांना अस्वच्छता करण्यापासून रोखले पाहिजे. आपल्या परिसरातील स्वच्छता व त्याबद्दल असणारा आदर हा खूप महत्वाचा आहे. आपण स्वयंशिस्तीने परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. मी स्वतः कचरा टाकणार नाही, घरात निर्माण होणारा ओला व सुका कचरा याचे मी वर्गीकरण करेल व उघड्यावर कोठेही मी थुंकणार नाही अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे.
सामाजिक बांधिलकी जपणार!
उदघाटन प्रसंगी बँकेचे अध्यक्ष कांतिलाल गुजर यांनी आपल्या प्रास्ताविकात बँकेचा कार्यविस्तार, भावी योजना स्पष्ट करत सतत सामाजिक उपक्रम राबविण्यात आम्ही पुढाकार घेऊन आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध राहू असे सांगितले. त्यानंतर परिवारातील 800 सदस्यांनी थेरगाव परिसरात विविध गटांच्या माध्यमातून स्वच्छता केली. मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले, आभार व्हाईस चेअरमन गबाजी वाकडकर यांनी मानले.