गजानन महाराज प्रकटदिन, हरी कीर्तनाचे आयोजन
रावेत : धर्म, अर्थ आणि कामप्राप्ती हे नैतिक मार्गाने साध्य केले तरच मनुष्याला मोक्ष मिळतो. मोक्षप्राप्तीच्या मार्गात संतविचार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यावेळी माणूस कर्तव्यापासून ढळतो आणि प्रलोभनांना बळी पडतो. तेव्हा गजानन महाराजांचे विचार जीवनाला योग्य मार्ग दाखवतात असे मत प्रवचनकार ह.भ.प. श्री गुरुवर्य गोपाळबुवा पाटील उरळकर महाराज यांनी व्यक्त केले. श्री संत गजानन महाराज शेगांव यांच्या 140 व्या प्रकटदिनानिमित्त गजानन महाराज मंदिरात आयोजित हरी कीर्तनाच्या वेळी ते बोलत होते.
विविध धार्मिक कार्यक्रम
या निमित्ताने 31 जानेवारी ते 07 फेब्रुवारी दरम्यान विविध किर्तनकारांचे कीर्तन, काकडा, पादुकांना अभिषेक, द्वादशस्कंद हवन, श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, श्रीमान भगवतकथा , पालखी सोहळा, हरिपाठ, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त गजानन महाराज मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संतांचे परमार्थिक मागणे
उरळकर महाराज पुढे म्हणाले की, संतांना ऐहिक सुखापेक्षा परमार्थिक सुखात समाधान लाभते म्हणून ‘हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ असे मागणे भगवंताकडे तुकोबा मागतात. भक्तीच्या आनंदापुढे मला मोक्ष आणि मुक्तीदेखील नको असे म्हणतात. धर्म, अर्थ आणि कामप्राप्ती हे नैतिक मार्गाने साध्य केले तरच मनुष्याला मोक्ष मिळतो. अशा प्रकारे विविध उदाहरणे देत उरळकर यांनी भगवत गीता आणि मानवी जीवनाचा मेळ घातला.
दररोज रात्री कीर्तन सेवा संपन्न
या हरिनाम सप्ताह सोहळ्यात दररोज रात्री कीर्तन सेवा होत होती. ह.भ.प. पोपट महाराज कासारखेडकर, पांडुरंग महाराज गिरी, संदीपने महाराज शिंदे, भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वर्हाडे, आसाराम महाराज बडे, संजय महाराज धोंडगे, महादेव महाराज राऊत यांनी कीर्तनसेवा सादर केली. या सोहळ्यानिमित्त दररोज काकडा आरती, गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजन, हरिकिर्तन, हरि जागर हे कार्यक्रम दररोज चालू आहेत. परिसरातील सर्व भक्त, भाविक, संत आणि नागरिकांनी या सप्ताह सोहळ्याचा लाभ घेतला.