तरतूद 8 कोटींची; खर्च मात्र पन्नास लाखच!

0

वाहतुकीच्या पायाभूत सुविधांसाठी अंदाजपत्रकात तरतूद; शिल्लक निधीचा वापर प्रभागातील कामांसाठी

पुणे : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि पोलीस यांचे एकत्रित प्रयत्न सुरू असतानाच वाहतुकीच्या पायाभूत सुविधांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेला निधी खर्च होत नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पायाभूत सुविधांसाठी अंदाजपत्रकामध्ये असलेल्या 8 कोटींपैकी जेमतेम पन्नास लाखांपर्यंतचा खर्च महापालिकेच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आला आहे.

महापालिकेच्या सन 2018-19 या वर्षांतील अंदाजपत्रकामध्ये शहरातील वाहतूक सुरक्षित आणि जलद गतीने होण्यासाठी वाहनतळ, पादचारी मार्ग, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल बांधण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते.

तळजाई टेकडी बोगद्यासाठी तरतूद

वाहतूक सुरळीत होण्यासाठी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर), तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगदा, बालभारती-पौड फाटा रस्ता आणि सिंहगड रस्ता परिसरात उड्डाणपूल या महत्त्वाकांक्षी कामांचा समावेश आहे. सिंहगड रस्ता आणि सहकारनगर, पद्मावती, पर्वती हा भाग एकमेकांना जोडण्यासाठी तळजाई टेकडीपासून सिंहगड रस्त्याला जोडणारा बोगदा विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एचसीएमटीआरच्या प्रक्रियेला गती मिळालेली नाही. तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगद्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद आहे. हे काम यंदा होण्याची शक्यता कमी असल्यामुळे निधीही वळविण्यात येण्याची शक्यता आहे.

गेल्या सात महिन्यांत खर्च

काही प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकामध्ये 225 कोटींची तरतूदही प्रस्तावित करण्यात आली. याशिवाय 8 कोटी 28 लाखांचा निधी पायाभूत सुविधांच्या विकसनासाठी प्रस्तावित करण्यात आला होता. या 8 कोटींच्या निधीतून सिग्नल, दुभाजकांची दुरुस्ती, आयलॅन्ड हटविणे, सूचनाफलक बसविणे अशा कामांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र या निधीपैकी पन्नास लाखच गेल्या सात महिन्यांत खर्च झाले आहेत.

महापालिका आणि पोलीस अधिकार्‍यांच्या बैठका

महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेत वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पावले उचलली होती. महापालिका आणि पोलीस अधिकार्‍यांच्या काही बैठकाही झाल्या होत्या. प्रमुख चौकातील अतिक्रमणे हटविणे, दिशादर्शक फलकांची उभारणी, सिग्नलचे सुसूत्रीकरण अशा काही उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मात्र या कामांसाठी प्रस्तावित असलेला निधी खर्च होत नसल्यामुळे बैठकांमध्ये ठरलेल्या उपाययोजना होणार का, याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सिंहगड उड्डाणपुलासाठी दहा कोटी

अंदाजपत्रकातील उड्डाणपूल, बीआरटीचा निधी प्रभागात विकासकामे करण्यासाठी वळविण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र चालू आर्थिक वर्षांत हे काम होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर हा निधी प्रभागातील अन्य कामांसाठी वळविण्यात आला. सोलापूर रस्त्यावरील प्रस्तावित बीआरटी मार्गासाठीच्या 70 कोटींच्या निधीचेही प्रभागातील कामांसाठी वर्गीकरण करण्यात आले.