तरीही जिंकण्यासाठीच खेळणार

0

नवी दिल्ली । भारताच्या 17 वर्षे मुलांच्या संघाचे प्रशिक्षक लुई नॉर्टन डी माटोस यांना 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघासमोर असलेल्या आव्हानांची पूर्ण कल्पना आहे. या स्पर्धेत भारतासाठी विजयाची शक्यता फार कमी असली भारतीय संघ चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्श्य वेधून घेईल असा विश्‍वास माटोस यांनी व्यक्त केला. 17 वर्षाखालील गटाची फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा भारतातील आठ शहरांमध्ये 28 ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक डी माटोस म्हणाले की खूप मोठे आव्हान समोर असल्याची जाणीव मला पहिल्यापासूनच होती. भारतीय संघाने देखील तयारीसाठी काही मित्रत्वाचे सामने खेळले आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या खेळात सुधारणा झाली आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्‍वास असणे महत्वाचे आहे, खेळाडू मैदानात सर्वोत्तम कामगिरी करतील असा माझा विश्‍वास आहे.

स्पर्धेत भारतासमोर कठिण आव्हान आहे. बलाढ्य संघाच्या गटात भारताचा समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल मोटोस म्हणाले की, स्पर्धेचा ड्रा पाहिल्यावर संघ जिंकण्याची शक्यता फार कमी आहे. अमेरिका, क्युबा आणि घानाचे संघ कसे आहेत माहित आहेच. तरीसुद्धा आम्ही जिंकण्यासाठीच खेळू. फिफा विश्‍वचषक स्पर्धेत यजमान भारताचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह अमेरिका, कोलंबिया आणि घाना या संघाचा समावेश आहे. अमेरिकेने यापूर्वी एकदाच 17 वर्षे गटाच्या विश्‍वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता.