तरीही ‘मिनाक्षी रिफायनरी’ कंपनी सुरूच

0

दौंड । दौंड तालुक्यामधील भांडगाव येथील मिनाक्षी रिफायनरी इनगार्ड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या अपघात झाला यावेळी सरकारी अधिकार्‍यांनी कंपनी बंद करण्याचे आदेश दिले गेले होते, पण गेल्या एक महिन्या पासून कंपनीचे उत्पादन चालू आहे, यावेळी कंपनी व्यवस्थापक यांनी पोलिस यंत्रणा आणि स्थानिक पुढारी हताशी घेवून उत्पादन प्रक्रिया चालू केली आहे.भांडगाव येथे भांडगाव – खोर रोड लगत असलेली मिनाक्षी रिफायनरी इनगार्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये स्क्रॅप लोखंड वितळवुन त्यापासुन लोखंड तयार करणार्‍या कंपनीमध्ये (दि.31 जानेवारी) रोजी सकाळच्या सुमारास भीषण स्फोट होऊन 7 परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाले होते. यामध्ये उपचारा दरम्यान 3 परप्रांतीय कामगारांचा मृत्यु झाला होता.

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
मिनाक्षी फायरी इनगार्ड्स प्रायव्हेट लिमिटेडने विनापरवानगी उत्पादन चालू केल्या प्रकरणी फैक्टरी एक महिन्या पासून कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास औद्योगीक सुरक्षा विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. शासन निर्णया नुसार कंपनी बंद ठेवणे बंधनकारक असतानाही कंपनीने उत्पादन चालू करने चुकीचे आहे, दरम्यान या कंपनीवर गुन्हा दाखल करने औद्योगीक सुरक्षा विभागाचे अधिकारी यांचे काम आहे, यामुळे पोलिस गुन्हा दाखल करु शकत नाहीत, असे पोलिस प्रशासना कडून सांगण्यात येत आहे, शासन नियमांचे उल्लंघन करणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल करने, कायदा आणि सुवव्यस्था रखने पोलिसांचे काम आहे, पण पोलिस या प्रकरणाकडे सोईस्कर पाहताना दिसत आहे, कंपनी व्यवस्थापकाला पोलिस पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे.

परिसरात धुरामुळे प्रदुषण
ही कंपनी भांडगाव लगत असून या कंपनी शेजारून भांडगाव – खोर हा राज्यमार्ग जात आहे. या कंपनीच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून याचा त्रास भांडगाव ग्रामस्थांना, गावालगत असलेल्या शेती पिकांना व येथून प्रवास करणार्‍या वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या कंपनीविषयी स्थानिक ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी करून याची दखल घेतली गेली नाही. ही कंपनी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असतानाच कंपनी पुन्हा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

आदेश झुगारून उत्पादन सुरूच
कंपनी विनापरवानगी चालू झाल्या प्रकरणी औद्योगीक सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि पोलिस यंत्रणा नागरिकांची दिशाभूल करताना दिसत आहेत. पोलिस आणि औद्योगीक सुरक्षा विभागाचे अधिकारी हे प्रकरण गोलमाल करत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये चालू आहे. या प्रकरणामध्ये संबंधित अधिकारी मालामाल झाले आहेत यामुळे कोणताही शासन विभाग कारवाई करण्यास ठेंगा दाखवत असल्याचे बोलले जात आहे.

या मीनाक्षी कंपनीला कारखाने अधिनियम 1948 अंतर्गत कलम 40 (2) अन्वये उत्पादन प्रकिया चालू करण्यात येऊ नये असे आदेश औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांनी दिले आहेत. परंतु उत्पादन प्रक्रिया सुरू न करण्याचे आदेश असताना कंपनीने दिड महिन्यानंतर आदेश झुगारत उत्पादन प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीकडून शासकीय आदेशाची पायमल्ली केली जात आहे.