तरुणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी रोजगार महत्वाचा

0

पुणे । मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे अनेक प्रश्‍न समोर येत असताना रोजगार नसण्याचा गुन्हेगारीशी खूप जवळचा संबंध आहे. बेरोजगार युवकांना केंद्रीत करून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रात ओढण्याचे प्रकार समोर आले आहेत. येरवडा कारागृहात कायदेविषयक चळवळ चालवित असताना बेरोजगारीमुळे गुन्हेगारीत ओढले गेलेले अनेक तरुण मी पाहिले. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा नवीन काही करता येत नाही, म्हणून हेच तरुण पुन्हा गुन्हेगारी क्षेत्रात जातात. त्यामुळे गुन्हेगारीकडे वळणार्‍या तरुणांना रोखण्यासाठी रोजगार महत्त्वाचा आहे, असे मत कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असिम सरोदे यांनी व्यक्त केले.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात लोहियानगर येथील सावित्रीबाई फुले सभागृहात नोकरी मेळावा पार पडला. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, आयुब पठाण, अ‍ॅड. शाबीर खान, उमेश काची, अविनाश अडसूळ, नरेश धोत्रे, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, भाग्यश्री काची आदी उपस्थित होते. नोकरी मेळाव्यात 11 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

नोकरी मेळावे महत्त्वाचे
माणसांना काम करण्याची इच्छा असते, परंतु त्यांना रोजगार मिळत नाही, तेव्हा मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन होण्यास सुरुवात होते. ते होऊ नये, म्हणून नोकरी मेळावा खूप महत्त्वाचा आहे, असे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले. नोकरी मिळाली नाही, म्हणून माणूस निराशेच्या गर्तेत जातो. केवळ चांगले कपडे आणि खूप पैसे असतील तर आपण चांगले होऊ शकत नाही. नोकरी मिळाल्यानंतर देखील ज्या समाजातून आपण आलो आहोत, ज्या रस्त्यांवर आपण माणसांना काम करताना पाहिले त्यांना विसरू नये, असेही त्यांनी सांगितले

तरुणांना प्रशिक्षण
अनेक कारणांमुळे व आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. अशावेळी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले. मेळाव्यात सहभागी झालेल्या काही कंपन्यांच्या प्रतिनीधींनी प्रशिक्षीत नसलेल्या तरुणांना तीन महिन्याचे प्रशिक्षण देऊन नंतर नोकरी देण्याचे ठरविले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.