पुणे । आपल्यावर कोणीही प्रेम केले नाही तरी चालेल, पण आपली कोणी किव करता कामा नये, अशी शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. सध्या दुर्दैवाने देशाची किव करावी असे प्रसंग घडताना दिसत आहेत. शिवाजी महाराज कोणत्याही प्रसंगाला घाबरले नाहीत तसे धैर्य प्रत्येकामध्ये येणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याची, धैर्याची, हिंदवी स्वराज्याच्या ध्यासाची प्रेरणा आजच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना त्यांनी केलेल्या संकल्पांचे स्मरण करायला हवे, असे मत स्वरुपवर्धिनीचे कार्यवाह ज्ञानेश पुरंदरे यांनी व्यक्त केले. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे शिवसूर्य स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक सम्राट थोरात, नगरसेविका आरती कोंढरे, विजयलक्ष्मी हरिहर, शाहीर दादा पासलकर, प्रभात मित्र मंडळचे किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख नितीन राऊत, नीलेश कांबळे, मंगेश शिंदे, रवींद्र भन्साळी, राजेश नाईक, केतन भागवत, अमोल थोरात, चंद्रकांत ढगे आदी उपस्थित होते.
घरोघरी असावे शिवचरीत्र
सध्याच्या काळात शिवाजी महाराजांचे चरीत्र आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार समजून घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी शिवचरीत्र असले पाहिजे. शिवजयंती ही केवळ उत्सव, घोषणांपुरता मर्यादीत राहता कामा नये. तर त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे ज्ञानेश पुरंदरे यांनी सांगितले.
शिवरायांचे स्मारक गरजेचे
पुण्यामध्ये शिवसृष्टी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक पुण्यात असणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे तरुणांपर्यंत शिवाजी महाराजांचे कार्य पोहोचले पाहिजे, असे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. दादा पासलकर म्हणाले, शिवजयंती ही तिथीप्रमाणेच साजरी झाली पाहिजे. शिवाजी महाराजांविषयी असलेले प्रेम, आदर हे प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून व्यक्त केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.